या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २५१

निघेल आणि स्वधर्मी भिक्षकांना दक्षिणा देऊन हिंदूंना जी परधर्मीयांना खेरीज द्यावी लागते, ती वाचेल. ती वाचविण्यापेक्षा जास्त मोठा फायदा म्हटला म्हणजे रिकामटेकड्या भिक्षुकांची संख्या थोड्याने का होईना पण कमी होईल; आणि समाजहितवर्धनास आवश्यक गुण-आपलेपणा, आत्मश्रद्धा, आत्मप्रेम हे जे हिंदूतून समूळ नाहीसे झाले आहेत, ते दुसऱ्यांशी विरोध न करतां परत येतील. सारांश, परधर्मी भिक्षुकांच्या साह्यावांचून प्रत्येक धर्मानुयायाला आपली धर्मकृत्ये निःशंकपणे करतां आल्याशिवाय कोणताही समाज स्वयंपूर्ण, स्वावलंबी, स्वाधीनोपाय, व कर्तबगार होत नाही ही गोष्ट जीवीं धरून वागले पाहिजे.

 हिंदूंमध्ये समाविष्ट असून ज्या हिंदु जातींना हिंदु समाज परधर्मीयांपेक्षाही दूर धरतो, त्यांची मुक्तता करणे अति महत्त्वाचे आहे. ज्यांच्या शास्त्रांनी नरदेहाची एवढी थोरवी गायली आहे की, जीव शिव एक आहेत, 'नर करनी करे तो नरका नारायण होय,' त्याच लोकांमध्ये सुमारे अर्ध कोट लोकांनी जातिधर्म म्हणून तस्करबाजी करावी; अर्धकोट लोकांनी पंथ किंवा संप्रदाय म्हणून दारसुन्या कुत्र्याप्रमाणे गांवोगांव भीक मागत हिंडून आळसांत, व्यसनांत किंवा गुन्हे करण्यांत दिवस घालवावेत; सहा सात कोटी लोकांना अस्पृश्यतेचा डाग लागावा; आणि ह्या सर्व वर्गांच्या एकंदर सात आठ कोटी लोकांच्या जन्माचे मातेरें व्हावे, ह्यापेक्षां पढतमूर्खपणाचे दुसरें शोचनीय उदाहरण कोणते असूं शकेल ? उपयुक्त धंदे करणारांत जर सुमारें एक कोटीवर राकट हिमती व हिकमती भिकार आणि गुन्हेगार व व्यभिचारी जमाती येऊन पडल्या, तर त्यांना पोसण्यासाठी सर्व हिंदोस्तानाला सुमारे ४० कोटी रुपयांचा भूर्दंड द्यावा लागतो तो वांचेल, आणि कमीत कमी त्या पन्नास कोटी रुपये कमावतील. त्यांच्या उद्धाराने ह्याप्रमाणे देशाचे दरसाल अब्ज रुपयांचे हित होईल. हे मोठे देशकार्य होईल खरे; पण ह्या हितापेक्षा माणसांतून वाहवलेले एक कोट लोक पुनः माणसांत येऊन बसले तर त्यांचे व तदितरांचे केवढे कल्याण होईल.आणि तें सर्वांना किती श्रेयस्कर होईल !!