हे पान प्रमाणित केलेले आहे.
३७
वतन-वृत्ति.

बाजूलाही स्वाभाविकपणे असें वाटावयाचे की, जर आम्ही हातावर शिर घेऊन राजाला यशस्वी केले आणि त्याच्या मुलाबाळांची निचिंती केली, तर त्यानेही आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या काळजीतून मुक्त करावें. आम्ही खानदानीचे लोक ज्याचे मीठ खाऊं त्याच्याशी आमच्या घरचे कुत्रं देखील हराम होणार नाही. ह्या उभयपक्षी मनोमय कयासाने राज्यांतील दिवाण, सेनापति, खजीनदार, फडणीस, मुजुमदार, चिटणीस इत्यादींसारख्या महत्वाच्या तहाहयात असाम्या वंशपरंपरेच्या केल्या, आणि रोकड तनख्यामोबदला जमीनमहसूल लावून देण्याची युक्ति काढली. सामान्यत्वे ह्या वंशपरंपरेच्या स्थावर नेमणुकांना इनाम ही संज्ञा प्राप्त झाली. सरकारच्या सार्वजनिक नोकरीच्या मोबदल्याबद्दल जमिनीचे उत्पन्न तोडून देण्याची जी ही योजना निघाली, ती सर्व प्रकारची सार्वजनिक नोकरीच काय पण वैद्यकी, गायन, नर्तनाप्रमाणे थेट निवळ खासगी नोकरी व भीकमाग्या दरवेसपणापर्यंत पांगली. हिलाच वतनपद्धति म्हणतात.

 वतनपद्धतीला जातीजातींच्या बहुविध जनतेकडून समाजव्यवस्थेत पाठिंबा मिळाला तसा राजाकडून राज्यव्यवस्थेत व धर्माध्यक्षांकडून धर्मव्यवस्थेत मिळाला. वतनी व्यवस्था गांवकींत सुदृढ व विस्तृत होण्याला वतनी राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था जशी कारणीभूत झाली, तशी जातिपोटजाति व पंथ ह्यांमध्ये जी धंद्यांची विभागणी झाली, तीही बऱ्याच अंशांनीं कारणीभूत झाली. जातिधर्माप्रमाणे अमुक धंदा अमक्या कुडीत जन्म घेणाऱ्या इसमाने करावयाचा असे ठरले. तो धंदा करणारा गांवांत


 १ नाही म्हणावयाला पुण्यश्लोक शिवाजीमहाराज मात्र इनाम देण्याला प्रतिकूल होते. "तो शिवाजी बहुधा कोणास जहागिर देत नसे...शिवाजीचे किती एक मानकरी लोक मसलत करीत कीं, लष्करास खर्चाची नेमणूक परभारें गांवगन्ना करावी, परंतु ते शिवाजीच्या मनास येईना; कां की, ते लोक स्वयें सत्ता करूं लागतील आणि रयतेस उपद्रव होईल हें, तो जाणत असे." ग्रँँटडफकृत मराठ्यांची बखर पाने ६४-५.