या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ४९


कुळकर्णी करी. ह्यांखेरीज गांवकऱ्यांची पत्रे, देण्याघेण्याचे दस्तैवज, पावत्या व त्यांचे सावकारी सरकारी देण्याचे जमाखर्च ,हेही लिहिणे तो लिही.

 गांवकीच्या कसबी कामाची जातवार वाटणी झाल्यावर बेगार काम उरलें. ते कोणतीही हुन्नरी जात पत्करीना. असे हे पडून राहिलेलें काम महारांच्या गळ्यांत पडले; म्हणूनच महार म्हणत असतात की, आम्ही काय पडल्या कामाचे चाकर. जें काम करण्याला अभ्यास, कला किंवा विशेषसें ध्यान नको त्याला बेगार (बे-कार ) म्हणतात. रोख मेहनतान्यावांचून करावे लागते त्या कामाला तेलंगणांत 'वेट्टी' म्हणतात; तेव्हां ह्या शब्दापासून 'वेठ' शब्द निघाला असावा. गांवगाड्याचा खराखुरा वेठ-बेगारी किंवा हरकाम्या फरास महार होय. जागल्याचे पर्यायशब्द 'रामोशी ' व 'भिल्ल' हे आहेत. 'अमुक वर्षी मांग अगर मुसलमान रामोसकीवर होता, भिलाबरोबर आरोपी पाठविला', असें लोक बोलतात. ' रान-वासी ' ह्या शब्दापासून रामोशी शब्द निघाला असावा. वेसकर व रामोशी ह्या व्यवसायवाचक शब्दांवरून महाराचा जाबता वेशीच्या आंत असावा असे वाटते. तरी पण तुफानी रानटी जाती निवळून गांवांत येईपर्यंत पांढरीप्रमाणे काळीचा चौकीपहाराही महाराकडे होता; आणि रामोसकी उर्फ जागलकी हे महारकी वतनाचा एक पोटविभाग आहे,हे अनुमान जास्त सबळ व सप्रमाण दिसते. ग्रामसीमांच्या वादांत सीमारक्षक ह्या नात्याने गांवमाहाराने दिव्य केल्याबद्दल ऐतिहासिक लेखही प्रसिद्ध झाला आहे. असो. महारांच्या कामाची पाळी आली व संपली म्हणजे 'काठी' आली व पडली असे म्हणतात,कारण कामगार महाराचे हातांत भली मोठी काठी असते. पाळीप्रमाणे सर्व वतनदार महारांच्या हातीं वेसकरकीची काठी चढते. वेसकर हे तेवढ्यापुरते समस्त महारांचे नाईक समजले जातात; आणि ते वेशीवर किंवा चावडीवर हजर राहून कामगार महारांच्या बाऱ्या वगैरे लावतात, व जरूर तितके महार कामावर आणून गुदरतात. मुलकी, फौजदारीसंबंधाने महारांची मुख्य कामें येणेप्रमाणे होतः-पट्टीसाठी असाम्यांना;