या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

 महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील आणि मराठवाडयातील काही भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे अनेकांना चिंता वाटली व वाटते. काही जाणकार कार्यकर्त्यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या जीवनाच्या आजच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांचे आर्थिक शोषण कसे थांबविता येईल आणि त्यांना स्वाभिमानाने कसे जगता येईल याचे मार्ग सुचविले आहेत. माझे मित्र डॉ. द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या पत्नी डॉ. शैला लोहिया यांनी कार्यकर्त्यांचा संच उभा करून मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 'मानवलोक' ही संस्था स्थापन केली. या संस्थेने गेली २५ वर्षे जे विधायक कार्य केले त्यामुळे अनेक स्त्री-पुरुषांना रोजगार मिळाला. दारिद्र्यरेषेखालील कितीतरी कुटुंबे स्वाभिमानाने जगू लागली. हे कार्य करताना डॉ. द्वारकादास लोहिया यांनी ग्रामीण भागाचे जे सूक्ष्म निरीक्षण केले, तेथील समाजरचनेचा जो अभ्यास केला, त्यामधून ते ग्रामीण जनतेच्या जीवनाच्या विकासासाठी काय केले पाहिजे या संबंधी काही निष्कर्षाप्रत आलेले आहेत. 'गाव झिजत आहे' या पुस्तकात त्यांनी ग्रामीण जीवनाच्या सद्यःस्थितीवर प्रकाशझोत टाकला असून ते जीवन सुधारण्यासाठीठी, त्या जीवनाची पुनर्रचना करण्यासाठी शासनाने आणि समाजाने तसेच ग्रामस्थांनीही काय केले पाहिजे ते वास्तववादी दृष्टिकोनातून सुस्पष्टपणे मांडले आहे. म. गांधींच्या ग्रामस्वराज्य या कल्पनेत कालानुरूप कोणते बदल केले पाहिजेत, एकमेकांच्या जवळच्या काही गावांचा एक विकास गट करून तो बव्हंशाने स्वावलंबी होण्यासाठी शेती उत्पादनाची पद्धती, पाण्याचे समान वाटप, पर्यावरणाचे रक्षण आणि रोजगार निर्मिती या बाबतीत काय केले पाहिजे हे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी या पुस्तकात अत्यंत सुगम शैलीमध्ये लिहिले आहे.

गाव झिजत आहे / पाच