पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अठ्ठावीस,कोणीं छत्तीस तर कोणीं शंभर, याप्रमाणें गीतेचे मूलभूत श्लोक[टंकनभेद] हुडकून काढले आहेत! शेवटी कित्येकांची मजल येथपर्यंत आली आहे कीं, गीतेंतील ब्रह्मज्ञान रणभूमीवर अर्जुनास सांगण्याचेंच कांही प्रयोजन नसून, वेदन्तावरील हा उत्तम लेख मागाहून कोणी तरी महाभारतांत घुसडून दिला आहे. बहिरंगपरीक्षणाचे हे प्रश्न[टंकनभेद] सर्वथा निरर्थक असतात असें नाही. उदाहरणार्थ, वर सांगितलेली फुलांच्या पाकळ्यांची किंवा मधाच्या पोळ्यातील छिद्रांची गोष्ट घ्या. वनस्पतींचें वर्गीकरण करितांना त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचाहि विचार अवश्य करावा लागतो; आणि मधाचे माप (घनफल) कमी न होतां सभोंवारच्या वेष्टनाचे माप (पृष्ठफल) ज्यामुळें लघुतम म्हणजे पराकाष्ठेचें कमी होऊन मेणाची अत्यंत काटकसर होईल, अशा आकाराची मध सांठविण्यांची छिद्रें पोळ्यांत असतात व त्यावरून मधमाशांच्या अंगचे उपजत चातुर्य व्यक्त होतें, असें आतां गणितानें सिद्ध झालें आहे. म्हणून अशा प्रकारच्या उपयोगाकडे दृष्टि देऊन आम्हीहि गीतेच्या बहिरंगपरीक्षणापैकीं महत्वाच्या कांहीं मुद्द्यांचा[टंकनभेद] विचार या ग्रंथाच्या अखेर दिलेल्या परिशिष्टांत केलेला आहे. परंतु ग्रंथाचे रहस्य ज्यास समजून घ्यावयाचें आहे त्यानें या बहिरंगपरीक्षकांच्या नादीं लागण्यांत कांही हांशील नाही. वाग्देवीचें रहस्य जाणणारे आणि तिची वरपांगी सेवा करणारे या दोहोंमधील भेद दाखविण्यासाठीं मुरारि कवीनें एक सरस दृष्टांत दिला आहे. तो म्हणतो -

'

समुद्राची अगाध खोली विचारावयाची असल्यास ती कोणास विचारावी ? रामरावणांच्या युद्धप्रसंगी मोठमोठे बहाद्दर व चपल वानरवीर पटापट समुद्र ओलांडून लंकेत गेले खरे ; पण समुद्राची गंभीर खोली त्या बिचाऱ्यांस कोठून माहीत असणार ? समुद्रमंथनाचे वेळी मंथा म्हणजे रवी करून देवांनीं ज्या पर्वतास समुद्राच्या तळाशीं सोडिलें, त्या पाताळास जाऊन भिडलेल्या बड्या मंदराचलासच याबद्दल खरी माहिती असणें शक्य आहे. मुरारि कवीच्या या न्यायाप्रमाणें गीतेचें रहस्य पहाण्यास गीतासागराचे ज्या अनेक पंडितांनीं आणि आचार्यांनीं मंथन केलें आहे त्यांच्या ग्रंथांकडेच आपणांस आतां वळले पाहिजे. या पंडितांपैकीं महाभारतकार हे अग्रगण्य होत. किंबहुना हल्लीच्या गीतेचे ते एक प्रकारें कर्तेच