पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
कर्मजिज्ञासा

३१

विवंचनेत पडून मनुष्य वेडा होउन जातो. अर्जुनावरचा प्रसंग यातलाच होता पण अर्जुनाखेरीज दुसऱ्या थोर पुरुषांसही असल्या अडचणी कशा येतात त्याचे महाभारतांत पुष्कळ ठिकाणी मार्मिक विवेचन आहे. उदाहरणार्थ, मनूने सर्व वर्णास सामान्य म्हणून सांगितलेल्या "अहिंसा सत्यमस्त्येय्ं शौचमिंन्द्रियनिग्रह" - अहिंसा, सत्य, अस्तेय, कायवाचामनाची शुध्दता, आणि इंदियनिग्रह (मनु. १०.६३) - या पांच सनातन नीतिधर्मांपैकी अहिंसेचीच गोष्ट आपण घेऊ. "अहिंसा परमो धर्म:" (मभा. आ. ११.१२) हे तत्व आपल्या वैदिक धर्मातच नव्हे, तर इतर सर्व धर्मातहि मुख्य गणिले आहे. बौध्द व ख्रिस्ती लोकांच्या धर्मग्रंथात ज्या आज्ञा आहेत त्यांत् "हिंसा करु नको" या आज्ञेस मनुप्रमाणेच पहिले स्थान दिलेले आहे. हिंसा म्हणजे नुस्ता जीव घेणेच नव्हे, तर दुसऱ्या प्राण्याचे मन किंवा शरीर यांस इजा करणे याचाहि त्यात समावेश होतो. अर्थात अहिंसा म्हणजे कोणत्याहि सचेतन प्राण्यास कोणत्याहि प्रकारे न दुखविणे होय. पितृवध, मातृवध, मनुष्यवध, हे हिंसेचेच घोर प्रकार असून जगातील सर्व लोकांच्या मते हा अहिंसाधर्म सर्व धर्मात श्रेष्ठ मानिला जातो. पण आता असे समजा कि, आपला जीव घेण्यास किंवा आपल्या पत्नीवर अगर कन्येवर् बलात्कार करण्यास, अथवा आपल्या घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिरस्थावर हरण करण्यास एकादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेउन सज्ज् झाला व जवळ दुसरा कोणीहि त्राता नाही तर असल्या अतातायी मनुष्याची आपण "अहिंसा परमो धर्म्:" म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी किंवा या दुष्टास - तो सामोपचाराने ऐकत नसल्यास - यथाशक्ति शासन करावे? मनु म्हणतो -

गुरुं वा बालवृध्दौ वा बाम्हणं वा बहुश्रुतम|
अतातायिनमायान्तं हत्यादेवविचारयन||

"असला अतातायी म्हणजे दुष्ट मनुष्य - तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे का विव्दान ब्राम्हण आहे, इकडे न पाहाता - बेशक ठार करावा!" कारण अशा वेळी हत्येचे पाप हत्या करणाऱ्यास लागत नसून, अतातायी आपल्या अधर्मानेच मारिला जातो, असे शास्त्रकर्ते म्हणतात (मनु ८.३५०) मनूनेच नव्हे, तर अर्वाचीन फौजदारी कायद्यानेहि आत्मसंरक्षणाचा हा हक्क काहि मर्यादा ठेवून कबूल केला आहे. अशा प्रसंगी अहिंसेपेक्षा आत्मसंरक्षणाची योग्यता अधिक समजतात. भ्रूणहत्या म्हणजे कोवळ्या पोरांची हत्या अति गर्ह्य् मानिली आहे; पण आडवे आले म्हणजे कापून काढावयास नको काय? यज्ञातील पशुवध वेदानेही प्रशस्त मानिला आहे (मनु ५.३१) तथापि पिष्टपशु करुन तोहि एकवेळ टाळता येईल (मभा. शां. ३३६; अनु ११५.५६) परंतु हवेत, पाण्यात, फळात वैगेरे ठिकाणी जे