पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना

पूर्ण झाला असें म्हणतां नाही. कारण मोक्ष व नीतिधर्म याचीं तत्त्वें गहन असून त्यांसंबंधानें अनेक प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी इतकें विस्तृत विवेचन केलें आहे की, फाजील संचार जाऊं न देतां त्यांतील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथात घ्याव्या याचा योग्य निर्णय करणें पुष्कळदां कठिण पडतें. पण महाराष्ट्रकविवर्य मोरोपंत यांनी वर्णिल्याप्रमाणे -

कृतान्तकटकाऽमल ध्वज-जरा दिसों लागली ।
पुरः सर-गदांसवें झगडता तनू भागली ॥[१]

अशी आमचीहि सध्यां स्थिति झाली असून संसारांतील सहचारीहि पुढें निघून गेले. यासाठी आपल्याला उपलब्ध झालेली माहिती, व सुचत आलेले विचार आपण लोकांस कळवावे, कोणी तरी 'समानधर्मा' सध्यां अगर पुढें निघून ते पुरे करील, अशा समजुतीनें हा ग्रंथ आतां प्रसिद्ध केला आहे. सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून ब्रम्हज्ञान[टंकनभेद], भक्ति, वगैरे नुस्त्या निवृत्तिपर मोक्षमार्गाचेंच गीतेंत निरूपण केलेलें आहे, हें मत जरी आम्हांस मान्य नाहीं, तरी मोक्षप्राप्तीच्या मार्गाचें भगवद्गीतेत[टंकनभेद] मुदलीच विवेचन नाही, असेंहि आमचें म्हणणे नाही, हे आरंभीच सांगणे जरूर आहे. किंबहुना प्रत्येक मनुष्यानें शुद्ध परमेश्वरस्वरूपाचें ज्ञान संपादन करून तद्द्वारा आपली बुद्धी होईल तितकी निर्मल व पवित्र करणें, हे गीताशास्त्राप्रमाणें त्याचें जगांतील पहिलें कर्तव्य होय असे आम्हीहि या ग्रंथांत स्पष्ट दाखविलें आहे. परंतु हा गीतेंतील मुख्य मुद्दा नव्हे. युद्ध करणें हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षीं कुलाक्षयादि घोर पातकें घडून जे युद्ध मोक्षप्राप्तीरूप आत्मकल्याणाचा नाश करणार तें करावें का करू नये, अशा कर्तव्यमोहांत युद्धारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठीं शुद्ध वेदान्तशास्त्राधारें कर्माकर्माचें व त्याबरोबरच मोक्षोपायाचेंहि पूर्ण विवेचन करून, आणि कर्में कधीच सुटत नाहीत व सोडूंहि नयेत असें ठरवून, ज्या युक्तीनें कर्में केलीं म्हणजे कोणतेंच पाप न लागतां अखेर त्यानेंच मोक्षहि मिळतो, त्या युक्तीचें म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेंच गीतेंत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे. कर्माकर्माच्या किंवा धर्माधर्माच्या या विवेचनासच आधुनिक केवळ आधिभौतिक पंडीत नीतिशास्त्र असें म्हणतात. हे विवेचन गीतेंत कोणत्या प्रकारें केलें आहे हें सामान्य पद्धतीप्रमाणें गीतेवर श्लोकानुक्रमानें[टंकनभेद] टीका करून दाखवितां आलें नसतें असें नाहीं. पण वेदान्त, मीमांसा, सांख्य, कर्मविपाक किंवा भक्ती, वगैरे शास्त्रांतील ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारें कर्मयोगाचें गीतेंत प्रतिपादन केलेलें आहे, व ज्याचा उल्लेख कधीं कधीं फारच संक्षिप्त रित्या केलेला असतो, त्या शास्त्रीय सिद्धान्तांची अगाऊ माहिती असल्याखेरीज

  1. केकावली