या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरें. जमीनीवरील करः-इ. स. १८३५ साली कोमुनदादी व इतर वहिवाटदार या कडून येणारा फोर व जुन्या काबिजादीतून वसूल होणारा “दीझिमुश" नांवाचा प्रत्यक्ष उत्पन्नावर ऐनजिनसी वसूल करण्यांत येणारा दशमभाग, हेच कायते जमिनीवरील कर होते, हे आपण मागे पाहिलेच आहे. १८८३ साली दीझिमुश हा कर काढून टाकून त्या ऐवजी तूर्त अमलांत असलेला “देस्सिम प्रेदियाल" (जमीनीच्या उत्पन्नाचा दशमांश) या नांवाचा कर जमिनीच्या नक्की उत्पन्नावर घेण्याचे ठरले व त्याप्रमाणे प्रथम सासष्ट, बारदेश, जंजिरेगोवा या तीन कोंसेल्यांत त्या ठरावाची अम्मलबजावणी झाली. इ. स. १८९८ च्या सुमारास सांखळी, पेडणे, काणकोण व केपें या कोंसेल्यांत प्रेदियाल बसविले जाऊन मुळचा कोमुनदादीचा फोर काढून टाकण्यात आला. दीझिमुशचा वसूल मक्तेदारामार्फत होई. ती पद्धति नष्ट करून हा नवा कर प्रत्यक्ष नाण्यांत घ्यावयाची वहिवाट सुरू झाली. अलीकडे हा कर शे. १० ऐवजी १२ टक्के आकारला जाऊ लागला आहे. प्रत्येक कोंसेल्यांत ज्युत फिश्काल दज् मात्रीझिश Junta fiscal das matrizes नांवाचें एक बोर्ड असते. ह्या बोर्डाचा अध्यक्ष आदमिनिस्वादोर दु कोसेल्यु हा असून जमाबंदीच्या पोटकचेरीचा मुख्य चिटणीस हा चिटणीस असतो. म्युनिसिपालिटीने निवडून दिलेले दोन सभासद व सरकारी वकील किंवा त्याचा प्रतिनिधि असे त्याचे सभासद असतात. खातेदारांची नांवें दस्तऐवजांनुसार न बदलल्यास त्याबद्दलच्या तक्रारींचा निकाल करणे, करांच्या आकारणीविरुद्ध तक्रारी ऐकून त्यांचा निकाल लवादामार्फत करणे व प्रेदियालचे फेरबदल सुचविणारे दोन इंफोर्मादोर ( माहितगार ) नेमणे, हेच या बोर्डाचे काम असतें. हे इंफोर्मादोर प्रतिवार्षिक किरकोळ फेरआकारणी सुचवितात. करांच्या आकारणीविरुद्ध तक्रार करावयाची झाल्यास, तिचा निकाल लवादमार्फत होतो. लवादांपैकी कुळाने एक लवाद नेमावयाचा असून दुसरा जमाबंदी खात्यामार्फत नेमला जातो व सरपंचांची नेमणूक न्यायखात्यांतून होत असते. प्रेदियालाची जनरल फेर तपासणीची मुदत २० वर्षांची आहे. आकारणीच्या साली व्यवहारांत असलेल्या बाजारभावाप्रमाणे कराची रक्कम ठरत असल्यामुळे, कधी कधी त्यांत चुका राहतात. तथापि एकंदरीत ब्रिटिश सरकारच्या वहिवाटीपेक्षां आकारणीची ही पद्धति पुष्कळच न्यायी असते यांत संशय नाही. वसुलाचे हप्ते व पद्धतिः-संपलेल्या सालचे प्रेदियाल दुसऱ्या वर्षाच्या जानेवारीच्या अखेरपर्यंत कचेरीत भरावयाचे असते. परंतु कुळांच्या सोयीसाठी