पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/100

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढवण्याकरता लक्ष्मीमुक्तीची शक्कल मी काढली असा काहींचा तर्क आहे.
 काहीजण म्हणतात कर्जमुक्तीच्या आंदोलनाच्या वेळी कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यात आपण हयगय केली. त्यामुळे नुकसान ओढवले. या वेळी अशी चूक करायची नाही. म्हणून लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम राबवावा.
 बरेच कार्यकर्ते विचार करतात, शरद जोशी शेतीमालाच्या भावाकरता इतके झटतात, धडपडतात. त्यांना लक्ष्मीमुक्तीची हौस असेल तर त्यांच्या समाधानाकरता एवढे काम करायला काय हरकत आहे? करून टाकू या लक्ष्मीमुक्ती !
 भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच मी अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमात डावपेच, युक्ती, खोटेपणा लपवाछपवी असे अजिबात काही नाही. हा अगदी निखळ आणि आरपार प्रामाणिक असा कार्यक्रम आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हा मुळी काही वेगळा कार्यक्रम नाहीच. शेतकरी संघटनेच्या, "उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव" कार्यक्रमाचाच हा एक भाग आहे. एवढेच नाही तर, अगदी निक्षून सांगतो, लक्ष्मीमुक्तीखेरीज रास्त भावाचा लढा संपूर्ण यशस्वी होणे शक्य नाही.
 आज आपल्यापुढे मी बोलणार आहे ते एवढी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी. शेतकरी संघटनेच्या दोन मूळ घोषणा कोणत्या? "शेतकरी तितुका एक एक" आणि "भीक नको, हवे घामाचे दाम" याच की नाही?
 आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. या सगळ्या मायबहिणी. या शेतकरी आहेत का नाहीत? लक्षात ठेवा मी काय विचारले. या 'शेतकरी आहेत का?' असे विचारले, 'शेतकरणी आहेत का?' असे नाही विचारले. शहरात डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण म्हणतात, मग तिला औषधपाण्याचे औषधाइतकेही ज्ञान नसले तरीसुद्धा. वकिलाच्या बायकोला वकिलीण म्हणतात, तिला भले कायद्याचा काहीएक गंधसुद्धा नसला, तरीही. शेतकरी मायबहिणी नुसत्या शेतकऱ्याची बायको म्हणून शेतकरणी नाहीत. त्या स्वतः शेतकरी आहेत.
 शेतकरी म्हणजे कोण? ज्याचे शेतावर पोट आहे तो शेतकरी. जो शेतांत घाम गाळतो तो शेतकरी. शेतकऱ्याच्या पोटचा पोरगा मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून शेतकऱ्यांचे गळे कापायला लागला तर तो भला शेतकऱ्याच्या रक्तामांसाचा असला तरी तो शेतकरी नाही असे आपण ठामपणे मांडतो.

 या सगळ्या माझ्या मायबहिणींचे पोट शेतावर आहे, त्या शेतात घाम गाळतात. फार काय, मशागतीची आणि इतर जड कामं सोडली तर पेरणी-

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९७