पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निंदणीपासून पार उफणणी, निवडण्या, पोती भरण्यापर्यंत सगळी कामे बहुतेक त्यातच करतात. शेतात काळ्या आईच्या अंगावर घामाचे १०० थेंब पडले तर त्यातले साठ-सत्तर थेंबतरी मायबहिणींच्या श्रमाचे असतात. म्हणजे या सगळ्या मायबहिणी शेतकरी आहेत हे नक्की.
 पण त्या शेतकरी आहेत म्हणजे शेतमालक आहे का शेतमजूर आहेत?
 शेतमालक म्हणावे तर त्यांच्या नावाने जमीन म्हणून नाही. ७-१२ च्या उताऱ्याला त्यांचे नाव नाही.
 शेतमजूर म्हणावे तर तेही मुश्किल. शेतमजूर सात-साडेसात तास काम करतात; पण ही आपली मायमाऊली पंधरा पंधरा तास राबते. दिवस नाही, रात्र नाही, ऊन नाही, पाऊस नाही. थंडी नाही वारा; नाही-राबते.
 शेतमजुराला किमान वेतन कायदा आहे. घरधनिणीला कसले किमान वेतन ? वर्षाला दोन लुगडी आणि पोटाला पुरेसे मिळाले म्हणजे धन्य झाले !
 मालकाशी पटले नाही तर मजूर दुसरीकडे काम धरेल. लक्ष्मी तर तुमच्या संकटात, आजारपणात, दुःखातसुद्धा तसं करायचा विचारही मनात आणणार नाही. अगदी मुजोर दांडग्या मालकाचीसुद्धा आताशी मजुरावर हात उगारायची हिंमत होत नाही. दोन दिवसांत तालुक्याच्या गावाहून पोलिस शिपाई येऊन धरून नेतील. पण बाईच्या बाबतीत, "पावसाने झोडपले आणि दादल्याने मारले तर तक्रार कुणाकडे करायची" अशी परिस्थिती. 'अंगावर कापड आणि पोटाला भाकर' यावर राबणाऱ्या माझ्या या मायबहिणी मजूरसुद्धा नाही. निव्वळ वेठबिगारच म्हटल्या पाहिजेत. वेठबिगारांकरतासुद्धा कायदे झालेत. पण शेतकऱ्याच्या गृहलक्ष्मीला काहीच कशाचा आधार नाही.
 शेतकरी संघटना म्हणजे काही 'शेतकरी पुरुष संघटना' नाही. मग एकूण शेतकरी समाजात संख्येने निम्म्या असलेल्या मायबहिणींच्या 'घामाच्या दामाचे' काय? त्यांच्या घामाला दाम कोण मिळवून देणार?
 शेतकरी संघटना गेल्या दहा बारा वर्षांत वाढली. गावठाणांतून राजवाड्यांत गेली. उत्तरेत पार पंजाबपर्यंत गेली. दक्षिणेत तामिळनाडूत गेली. पण शेतकऱ्याच्या घरांतल्या चुलीपर्यंत फारशी पोचली नाही.

 दहा एक वर्षांपूर्वी मला मराठवाड्यांतील एका शेतकरी बहिणीने प्रश्न केला. "भाऊ शेतीमालाला भाव मिळाला म्हणजे सगळे सुखी होतील असं तुम्ही म्हणता. शेतकरी सुखी होईल. मजुराला मजुरी मिळेल, बलुतेदाराला काम मिळेल, व्यापार-उदीम वाढेल. देश सारा भरभराटीला येईल असे तुम्ही म्हणता. पण खरं सांगा भाऊ, शेतीमालाला भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९८