पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरच्या बाईला एखादातरी दिवस सुखाचा भेटेल का हो?"
 म्हणजे आपण सगळे शेतीमालाच्या भावाकरता आकाशपाताळ एक करीत होतो आणि ही लक्ष्मी देवाला आळवणी करीत होती शेतीमालाला भाव न मिळो म्हणून!
 आणखी एका शेतकरी बहिणीने तिच्या आयुष्याची चित्तरकथा सांगितली. डोळ्यांतून आसवं गाळीत सांगितली.
 तिला तीन भाऊ. बापाची जमीन पंधरा एकर. बाप वारल्यावर तीन भावांनी पाच पाच एकर वाटून घेतली. मुलीच्या नावाने काहीच नाही. थोरल्या भावाने जरा उजवी जमीन घेतली आणि त्याबदली बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतो म्हणाला. पोरीचे लग्न ठरले. ५००० रुपये खर्च करायचे ठरले. पण ऐन लग्नाच्या मुहूर्तावर थोरल्या भावाने काखा वर केल्या. माझ्याकडे रुपये नाहीतच तर देऊ कुठून, म्हणाला. असं घडल्यावर काय होणार? व्हायचं तेच झालं. माहेरच्या माणसांना माया नाही तर सासरची माणसं कसली कीव करतात? त्यांनी तिला माहेरी परत पाठवून दिले. रुपये घेऊन आलीस तर परत ये म्हणून तिला सांगितलं. बाई सांगत होती, 'भाऊ, माहेरी येऊन आता पंधरा वर्षं झाली. भावाच्या घरी राहते. समोर ठेवतील ते पोटात ढकलते. एखाद्या वर्षी भावाने नवे नेसूंचे घेऊन दिले तर आनंद वाटतो. नाहीतर जुन्यावरच दिवस काढायचे. आता संसाराचा विचारही मनात येत नाही. पोरांबाळांची स्वप्नंसुद्धा विरली. भावजय तोंडाची मोठी फाटकी आहे. पण तिचं बोलणं ऐकलंच नाहीसं दाखवते आणि आलेला दिवस गेला म्हणत देवाचे आभार मानते. पण भाऊ उद्याचं काय? उद्या माझे हातपाय चालेनासे झाले तर मी जाऊ कुठे आणि करू काय?'
 'गेली पंधरा वर्षे अब्रूच्या भीतीने भावाच्या आश्रयाने राहिले. याच्यापेक्षा शेजाऱ्याच्या शेतावर रोजीने गेले असते, तर काय चारपाच रु. रोज मिळाला असता. दिवसाकाठी चार आठ आणे शिल्लक टाकले असते तरी आजपर्यंत काहीतरी पैसे आधाराला साठले असते. भावाकडे राहिले म्हणून आज माझी स्थिती अशी की अंगावरची कापडं आणि पोटात सकाळी ढकलेली भाकर याखेरीज माझं म्हणून या उभ्या जगात काहीच नाही.'

 महाराष्ट्र तर गरीब आहे. पण पंजाब तर मोठा सुजलाम् सुफलाम् म्हणतात ना? हरितक्रांती तेथे झाली म्हणतात. शेती फायद्याची तेथेही झाली नाही; पण शेतकऱ्यांच्या हाती पैसा तर खेळू लागला? या सगळ्या संपन्नतेचा घरच्या लक्ष्मीला काय लाभ मिळाला? काहीसुद्धा नाही. उलट तिचं आयुष्य आणखीच

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९९