पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आटोक्यात येते' या इतिहाससिद्ध अनुभवाला डावलण्यात येऊन लोकसंख्या आटोक्यात ठेवण्याच्या कार्यक्रमाची सूत्रेही सरकारच्या हाती देण्यात आली. सामाजिक विकासासाठी सरकारांनीच प्राधान्याने पुढे आले पाहिजे असे कोपनहेगनच्या (१९९५) परिषदेत सांगण्यात आले. बेजिंग येथील जागतिक महिला परिषदेत आता याच 'गवश्या' कार्यक्रमासाठी 'हौसे आणि नवसे' एकत्र आले.
 बेजिंगच्या घोषणापत्रासाठी एकच हितसंबंध असलेले तीन गट एकत्र आले आणि या तिघांचे हे कारस्थान आहे हे स्पष्ट होते. संयुक्त राष्ट्रसंघातील नोकरशहा परिषदेच्या सचिवालयाच्या रूपाने बेजिंग येथे उपस्थित होते. होयारू येथे, बेजिंगपासून पन्नास किलोमीटर दूर गैरसरकारी संघटनांच्या महिला प्रतिनिधी डेरेदाखल झाल्या होत्या आणि सरकारांचे अधिकृत प्रतिनिधी आणि मंत्री अनधिकृत परिषदेस उपस्थित होते. या तिघांनाही सरकारी नोकरशाही आणि सत्ता वाढवण्यात स्वारस्य होते आणि त्यामुळेच बेजिंग दस्तावेजांच्या निमित्ताने त्यांनी शासनांच्या हाती कोलित दिले.
 'नोकरदारांची संख्या वाढली की त्यांचे कामही आपोआप वाढत जाते' हा पार्किन्सनने प्रसिद्ध केलेला सिद्धांत. संयुक्त राष्ट्रसंघाची बांधणी गेली कित्येक दशके या सिद्धांतानुसारच होत आहे. इस्पितळ चालवण्यासाठी रोगी दाखल होण्याची गरज आहे हे त्यांना मान्य नाही. इस्पितळातील नोकरवर्ग एकमेकांना पगारभत्त्यांचे काम पुरवून सर्व वेळ कामात व्यग्र राहू शकतो अशी त्यांची मनोधारणा आहे. अशा धारणेनेच संयुक्त राष्ट्रसंघातील संस्था स्थापन केल्या जातात आणि चालवल्या जातात.
 बेजिंगमध्ये गैरसरकारी संस्थांच्या परिषदांकरिता जमलेल्या स्त्रियांची स्थितीही अशीच. मेक्सिकोमध्ये जमलेल्या स्वयंसिद्धा, बुद्धिमान, कर्तृत्वशाली स्त्रीप्रतिनिधींचा येथे मागमूसही नाही. आता जमल्या होत्या पगारदार, नोकरदार स्त्रिया आणि सरकारी किंवा देशीपरदेशी संस्थांकडून निधी मिळवून त्यातून स्त्रीमुक्तीच्या नावाने कार्यक्रम चालवून उदरभरण करणाऱ्या. बेजिंग येथील या महिला प्रतिनिधींना आपोआपच दुय्यम स्थान मिळाले आणि सर्व प्रकाशझोत सरकारी परिषदेकडे वळाला. याबद्दल महिलांना तक्रार करणेही शक्य नव्हते. महिला प्रतिनिधी तेथे जमल्या त्याच मुळी सरकारी कृपादृष्टीमुळे. त्यांतील बहुतेकांच्या बाबतीत त्यांचे कार्यक्रम पुढे चालणे, न चालणे हे त्यांच्या त्यांच्या सरकारांच्या मेहरनजरेवरच अवलंबून होते.

 स्त्रीचळवळीविषयीची जुनी निष्ठा संपली आणि आता गैरसरकारी स्त्रियांच्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ११९