पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/146

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याखेरीज, स्त्रियांची वेगळी महिला बँक, स्त्रियांची वेगळी पतपेढी, स्त्रियांचा वेगळा साखर कारखाना असे अनेक क्षेत्रांत 'जनाना डब्बे' करण्यात अनेक संस्था गुंतल्या आहेत. या कार्यकर्त्यांचे त्यांच्या कामाबद्दल, कौशल्याबद्दल, कर्तबगारीबद्दल कौतुकच केले पाहिजे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत अशा विधायक कामगिरीचे मोठे जबरदस्त नमुने उभे राहिले आहेत. तरीही, ही कामे महिला चळवळीचा भाग आहेत का हा प्रश्न तपासून घेतला पाहिजे.
 स्त्रीआयुष्याचा काही एक ढाचा असतो. घरगुती काम, मुलांची देखभाल, बाळंतपणाच्या काळातील अडचणी हे सारे लक्षात घेतले तर शाळाकॉलेजांची वेळापत्रके आणि कारखाने, कार्यालये यांच्या काम करण्याच्या पद्धती स्त्रियांना अडचणीत टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे, बरोबरीच्या नात्याने स्त्रियांना या क्षेत्रांत स्पर्धेत उतरण्यास आणि कर्तबगारी दाखविण्यास वाव मिळत नाही ही गोष्ट खरी. पण, या तऱ्हेची कामे दानधर्माच्या आणि करुणेच्या भावनेने हाती घेणे योग्य नाही. सध्याच्या व्यवस्थेत लोकसंख्येतील निम्मा भाग असलेल्या स्त्रियांची शक्ती व्यर्थ जात असेल तर त्याच कार्यक्षमतेचा उपयोग करून बाजारपेठेत उतरणे सहज शक्य व्हावे. असे करण्यात भांडवलाच्या तुटवड्याची अडचण तशी किरकोळ असते; स्त्रीच्या मनात शतकानुशतके रुजविण्यात आलेला न्यूनगंड आणि आत्मसन्मानाचा अभाव हे खरे अडथळे आहेत. सहानुभूतीच्या आधारावर केवळ असे कार्यक्रम आखले गेले तर ते सदासर्वकाळ चालतच ठेवावे लागतील. या उलट, आपल्या व्यक्तित्वाविषयीचा न्यूनगंड दूर करून त्यांना आत्मसन्मानाची भावना देता आली तरच हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकेल.
  शास्त्रांना गवसणी

 स्त्रीमुखंडींचा एक मोठा प्रभावशाली गट आणखी एक वेगळ्या प्रकारचे काम करीत असतो. स्त्रियांच्या प्रश्नाचे नेमके स्वरूप काय? स्त्री शरीराने कमजोर नाही, बुद्धीने कमी नाही तरी समाजातील तिचे स्थान सर्वदूर दुय्यम का झाले ? समाजातील श्रमविभागणी लिंगभेदावर का आखली गेली? चूलमूल या रगाड्यातून स्त्रीची सुटका होऊ शकते किंवा नाही? असे अनेक प्रश्न अभ्यासणे, समजून घेणे महिला आंदोलनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. यासाठी अनेक स्त्रिया पायाभूत अभ्यास परिश्रमाने करीत आहेत. वेगवेगळ्या देशांत, प्रदेशांत, जातीत, काळात स्त्रियांची परिस्थिती काय आहे/होती याबद्दल तपशीलवार माहिती व आकडेवारी गोळा करणे ; याखेरीज, प्राग्मानववंशशास्त्र, इतिहास,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४३