पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/15

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरी परत येते. घरी आल्यावर पुन्हा एकामागोमाग एक कामे. सगळ्यांची भाकरी खाऊन झाली की, मग उरलेल्यातून स्वत:चे भागवून तिची पाठ जमिनीला लागते. यांतील घरची कामे सोडून दिली आणि फक्त शेतातील कामे मोजली तर बायांच्या घामाचे जे थेंब मातीत जिरतात त्यांची संख्या मातीत पडलेल्या, पुरुषांच्या घामाच्या थेंबांपेक्षा दुपटीने अधिक असते. हे केवळ काव्य नाही, याला अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शास्त्रीय आकडेवारीचा पुरावा आहे.
 शेतकऱ्यांना घामाचे दाम हवे तर त्यांना मिळणाऱ्या दामाच्या दुपटीने दाम लक्ष्मीला मिळायला हवे. पण, तिला तर काहीच मिळत नाही. जमिनीवरच्या एखाद्या तुकड्यावरचा मालकी हक्क तर सोडाच, पण रोजाने येणाऱ्या मजुराइतकीही कमाई शेतकऱ्याच्या कारभारणीला म्हणजे शेतमालकिणीला मिळत नाही. शेतीच्या प्रश्नाकरिता शेतकरी संघटना उभी राहिली, शेतकऱ्याच्या लक्ष्मीकरिता कोण उभे राहणार? शेतकरी महिलांची संघटना हवी ही मनीषा माझी दिवंगत पत्नी लीला हिने सटाण्याच्या अधिवेशनात मंचावरूनच मांडली होती. स्वित्झर्लंडमधील सारा ऐषआराम सोडून शेतकऱ्यांच्या सेवेत जिच्या आधाराने रुजू झालो तिची इच्छा टाळता कशी येईल? पण ती पुरी तरी कशी करावी? शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी आंबेठाणच्या मुरमाड जमिनीत मी कठोर तप करून शेतकरी जीवनाशी सरूपता साधली; शेतकऱ्याच्या लक्ष्मीशी अशी सरूपता कशी साधावी? आदि शंकराचार्यांनी भारतीच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता परकायाप्रवेश केला, अशी सिद्धी मला पामराला कोठून यावी?

 जेथे जेथे समस्या असेल तेथे तेथे उभे राहावे, परिस्थितीची दाहकता प्रत्यक्ष अनुभवाने समजून घ्यावी म्हणजे प्रश्नही समजतो आणि उत्तरही आपोआपच स्फुरू लागते. चांदवडचे शेतकरी महिला अधिवेशन, खरेतर, १९८५ सालीच व्हायचे ठरले होते. चंडीगडच्या तुरुंगात मला हृदयविकाराचा झटका आला आणि ते पुढे ढकलले गेले ही माझ्या दृष्टीने मोठी इष्टापत्तीच ठरली. 'अस्तुरी जल्मा'चा आकांत अनुभवायचा, समजून घ्यायचा, केवळ वर्तमानातील नव्हे तर अनादि काळापासून या प्रश्नाचा उगम आणि सातत्य समजवून घ्यायचे; सारेच काही प्रचंड आव्हानाचे काम. तरुणपणी माझ्या साम्यवादी जीवनकालात एंगल्सचे ‘कुटुंबसंस्था, खासगी मालमत्ता आणि राजसत्ता यांचा उगम' हे पुस्तक वाचले होते, एवढेच नव्हे तर, पचवले होते. पुरुषांनी आपली मालमत्ता आपल्या जैविक वारसास मिळावी अशा बुद्धीने स्त्रियांवर बंधने घातली आणि ती, अशा सामाजिक श्रमविभागणीत काहीही सोयीस्कर नसताना, स्त्रियांनी स्वीकारली ही कल्पना पटण्यासारखी नव्हती. स्त्रियांवरील

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४