पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
  • स्त्री आणि पुरुष यांत संघर्ष नाही. वर्गविग्रहाचा सिद्धांत मुळात चुकीचा; स्त्री-पुरुष प्रश्नात तर तो सर्वस्वी गैरलागू आहे.

 हा तर्कशुद्ध विचार मांडताना शेतकरी महिला आघाडीने जागतिक मान्यता असलेल्या अनेक विचारप्रवाहांना आव्हान दिले आहे.
 पूर्वापारच्या समजुती उधळल्या
 स्त्री ही निसर्गातील दुय्यम निर्मिती आहे, पुरुषार्थाच्या मार्गातील अडचण आहे, पापाचे साधन आहे, तिला मुक्तीचा अधिकार नाही, पती हाच तिचा परमेश्वर, तिला स्वातंत्र्याचा अधिकार नाही असली बाष्कळ विधाने सर्व धर्मांत आणि पारंपरिक विचारपद्धतींत सापडतात. स्त्री ही माणूस आहे, संसारातील चारही अर्थ केवळ 'पुरुषार्थ' नसून 'मानवार्थ' आहेत आणि स्त्रियांचाही त्यांवर अधिकार आहे हे शेतकरी महिला आघाडीने स्पष्ट केले.
 मार्क्सवादी, समाजवादी, साम्यवादी आणि इतर फुटकळ डावे पंथ यांनीही स्त्रियांकडे आलेल्या चुलमूल जबाबदाऱ्या जीवशास्त्रीय कारणांनी आल्या असे मानले. स्त्री ही खासगी मालमत्ता झाली आहे; खासगी मालमत्ता संपविली, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चूलमूल कामांचे सार्वजनिकीकरण झाले म्हणजे स्त्रियांचा प्रश्न संपेल असे त्यांनी मांडले. या साऱ्या मांडणीस आणि शिवाय, वर्गसंघर्षाच्या कल्पनेस शेतकरी महिला आघाडीने आह्वान दिले.
 स्त्रीचळवळीच्या काही मुखंडींनी स्त्रीप्रश्नाचे विश्लेषण करताना बलात्काराच्या वा अन्य धाकाने पुरुषशाहीने सर्व स्त्रीसमाजाला गुलाम बनविले, एका बाजूस सर्व पुरुष आणि एका बाजूस सर्व स्त्रिया असा हा सनातन संघर्ष आहे अशी मांडणी केली. या उलट, शेतकरी महिला आघाडीने स्त्री व पुरुष यांना निसर्गाने परस्परपूरक बनविले आहे, त्यांच्यातील संघर्ष सामाजिक- आर्थिक परिस्थितीमुळे काही काळापुरता तयार झाला आहे, असे मांडले.
 स्त्रियांचे स्वतंत्रतावादी आंदोलन
 बाकी, इतर महिला संघटना आणि शेतकरी महिला आघाडी यांच्यातील फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा मांडता येईल:

 शेतकरी महिला आघाडी व्यक्तिस्वातंत्र्याला जपते, शासन ही दुष्ट संस्था मानते, स्त्री व पुरुष यांनी व्यक्ती व्यक्ती म्हणून आपापल्या स्वातंत्र्याच्या कक्षा जोपासाव्यात हीच त्यांची इतिहाससिद्ध आणि निसर्गदत्त प्रवृत्ती आहे असे मानते. या उलट, धार्मिक, डावे आणि स्त्रीवादी साऱ्या स्त्रियांना एक कळप मानतात आणि त्यांच्या नियमनासाठी काही नीतिनियम, कायदेकानू आणि

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५०