पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/21

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भावजयीच्या शिव्या खात कष्टणाऱ्या बाईनेही, २० वर्षांच्या कष्टानंतर 'अंगावरील धडुतं आणि पोटात सकाळी पडलेली कोरभर भाकर' याखेरीज या जगात आपलं असं काही नाही अशी आपली कैफियत मांडली.
 बायकांची स्वत:चे मन सांगण्याची शक्ती शेकडो वर्षांपूर्वी खुंटून गेली आहे. पाहणी करायला प्रश्नावली घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांचीही समस्या हीच असते. कोणतेही उत्तर सरळ म्हणून यायचे नाही. इकडे तिकडे पाहत, आपले उत्तर कोणाला नापसंत तर होत नाही ना याचा अंदाज घेत ते देण्याची कला बायकांनी पराकोटीची सिद्ध केली आहे. शेकडो वर्षांच्या कोंडमाऱ्यानंतर, आमच्या या बैठकांत बाया बोलू लागल्या. शब्द अशुद्ध, व्याकरण मोडकेतोडके, पण अनुभवांची नोंद खणखणीत बंद्या रुपयाची.
 चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाआधी महाराष्ट्रभर अशा चारपाच बैठका झाल्या. मग, आंबेठाण येथे महिला कार्यकर्त्यांची शिबिरे झाली. 'चांदवडची शिदोरी' तयार झाली. चांदवडला लाखांनी बाया जमल्या. त्यांनी एका आवाजात साने गुरुजींचे 'किसानांच्या बाया आम्ही, शेतकरी बाया' हे गीत म्हटले ; नारायण सुर्त्यांच्या शब्दांतील 'डोंगरी शेत माझं गं, मी बेनू किती?' ही आर्त कैफियत चांदवडच्या, उंच भिंतींसारख्या पहाडांसमोर ऐकवली; 'आम्ही स्त्रिया माणसं आहोत' ही घनगंभीर घोषणा केली. पुढे, इतिहास घडला.
 शेतकरी महिला आघाडी
 शेतकरी महिला अघाडीने 'दारू दुकान बंदी'चा कार्यक्रम राबविला. स्त्रियांच्या राजकीय सबलीकरणासाठी पंचायत राज्य निवडणुका, १०० टक्के महिला पॅनेल उभे करून, लढविण्याची घोषणा केली. काही ग्रामपंचायतींत संपूर्ण महिला पॅनेल निवडून आणले आणि चांगला कारभार करून दाखवला. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कब्जा आंदोलन केले. लक्ष्मीमुक्ती अभियानात कमीत कमी दोन लाख स्त्रियांना त्यांच्याच माणसांकडून जमीन मिळवून दिली. स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्कांसंबंधी सर्व कुटुंबीयांना भागीदार समजण्याची संकल्पना मांडली. ज्या गावांना पाण्याच्या टाकीचा खर्च झेपत नाही तेथे टाकीशिवाय पाणीपुरवठ्याची वाघाळे-आसखेड योजना अमलात आणली. असा हा सारा इतिहास घडला.

 साऱ्या देशभर चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाचे कौतुक झाले. त्या काळच्या स्त्रियांच्या संघटना प्रामुख्याने स्थानिक असत. दोनचार सुशिक्षित महिला प्रमुख असत. त्यांतील बहुतेक स्वत:च्या वैयक्तिक अनुभवापोटी सगळ्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २०