पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/26

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊ लागली होती. सुवर्णमहोत्सवाचे कार्यक्रम झाले पण, ते सर्व सरकारी यंत्रणेने आयोजित केले होते. लोकांची उपस्थिती किरकोळ. समारंभात पुढाऱ्यांचीच भाषणे झाली; सामान्य भारतीय मूकच राहिला. पुढाऱ्यांच्या भाषणांत आत्मपरीक्षणाचा लवलेशही नव्हता, शब्दांच्या आतषबाजीने आत्मप्रौढी तेवढी सांगितली जात होती. सुवर्णजयंती महोत्सव झाला तो व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या सुवर्ण महोत्सवासारखा, लोकांच्या उत्साहाविरहित.
 जनसंसदेची तयारी
 शेतकरी संघटनेने जनसामान्यांचा सुवर्ण महोत्सव घडवून आणायचे आणि त्यात आत्मपरीक्षणावर जास्त भर देण्याचे ठरविले. १९९८ साली अमरावती येथे जनसंसद भरविण्यात आली आणि निष्कर्ष 'स्वातंत्र्य का नासले?' या अहवालाच्या आधारे काढले गेले.

 शेतकरी महिला आघाडीच्या एका बैठकीत प्रश्न उभा झाला की, 'स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीच्या व अधोगतीच्या ताळेबंदाचा निष्कर्ष स्त्रियांनाही लागू पडतो का?' पुरुषांची आणि सर्वसाधारण समाजाची प्रगती झाली तरी महिलांची प्रगती होतेच असे गृहीत धरता येत नाही. पंजाब-हरियाणात हरित क्रांती झाली, अन्नधान्याचे उत्पादन वाढले पण, शेतीतील मजुरी बिहार किंवा ओरिसातून आलेल्या मजुरांकडे गेली. निदान शेतामध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य असलेली पंजाब-हरयाणाची स्त्री घरात कोंडली गेली व शेतावरील सर्व कामकऱ्यांकरिता रोट्या बडविण्याचे ज्यादा काम तिच्याकडे आले. पूर्वी डोक्यावरून भाजीपाला घेऊन बाजारच्या गावी जाणारी शेतकरी स्त्री, मालकाच्या हाती ट्रॅक्टर आल्यावर किंवा वाहतुकीची इतर सोय झाल्यामुळे घरी बसली आणि पुरुष मंडळी ट्रॅक्टरवरून बाजारगावी जाऊ लागली. भाजीपाला, दूध, अंडी, कोंबड्या, शेळ्या इत्यादीच्या विक्रीची मिळकत पूर्वी बायांकडे येई. आता ती सगळी पुरुषांकडेच राहू लागली. शेतकरी महिला आघाडीच्या एका शिबिरात, कोणाही विदुषीला न सुचलेला सिद्धांत मांडण्यात आला. स्त्री-चळवळीची नेमकी विषयपत्रिका कोणती? समाजाची आर्थिक सामाजिक सुधारणा हा सर्वच संघटनांचा विषय आहे. महिला संघटनांनी या विषयावर लिहिण्यास किंवा बोलण्यास काही हरकत नाही. स्त्रियाही नागरिक आहेत, माणूस आहेत; मनुष्य म्हणून या सर्व विषयांवर बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, महिलांच्या प्रतिनिधी म्हणून महिला संघटनांच्या विषयपत्रिकेत हे प्रश्न मोडत नाहीत. मग त्यांच्या विषयपत्रिकेत कोणते विषय मोडतात? शेतकरी महिलांनीच उत्तर दिले, जेथे जेथे पुरुषांचा विकास आणि स्त्रियांचा विकास यांच्यातील

चांदवडची शिदोरी: स्त्रियांचा प्रश्न / २५