पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/33

हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशावर होणार आहेत.
 स्त्रियांवर घरामध्येच होणाऱ्या अत्याचारांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक कायदा संमत करण्यात आला आहे. त्या कायद्यामध्ये, नीट विचार न केल्यामुळे, स्त्रियांच्या अगोचर वागणुकीस उत्तेजन मिळाल्यासारखे होणार आहे आणि त्यामुळे, सबंध विवाहसंस्थाच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
 स्त्रियांवर घराबाहेर होणाऱ्या अत्याचारांसंबंधीही एक कायदा संमत करण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये एक 'तालीबानी' प्रवृत्ती दिसून येत असून त्यामध्ये स्त्रीपुरुषांनी जरासुद्धा एकमेकांशी संपर्क ठेवू नये अश्या प्रकारची बुद्धी वापरण्यात आली आहे. या 'तालीबानी' कायद्यामुळे देशातील निकोप स्त्रीपुरुष संपर्काचे वातावरण संपून जाईल आणि स्त्रियांना पुन्हा एकदा जनाना डब्यात ढकलले जाईल अशी सार्थ भीती आहे.
 शेतकरी महिला आघाडीचे विचारमंथन
 या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्याकरिता शेतकरी महिला आघाडीने पुन्हा एकदा शेतकरी महिलांच्या बैठका भरवल्या. या बैठका नांदेड (१५, १६ सप्टेंबर २००६), चंद्रपूर (२०, २१ सप्टेंबर २००६ आणि बुलढाणा जिल्यातील धाड (२७, २८ सप्टेंबर २००६) येथे भरविण्यात आल्या.
 या सर्व बैठकांत चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात मंजूर झालेले ठराव, चांदवड अधिवेशनात घेण्यात आलेली महिला आघाडीची शपथ यांचा परिच्छेदवार विचार करण्यात आला आणि स्त्रियांच्या दृष्टीने त्या अधिवेशनानंतरच्या काळात काय फरक झाला याचा आढावा घेण्यात आला; तसेच, संपुआ सरकारच्या स्त्रीविषयक धोरणाबद्दल काय भूमिका घेण्यात यावी यावरही विचार करण्यात आला.
 शेतकरी स्त्रियांच्या प्रतिक्रिया
 स्त्रियांच्या प्रतिक्रिया मोठ्या वाखाणण्यासारख्या होत्या.
 स्वातंत्र्यानंतरच्या काळात महिलांची सुरक्षितता अधिकच धोक्यात आली आहे. इंग्रजांच्या काळात गुंडांनी स्त्रियांवर केलेले अत्याचाराचे प्रकार फार क्वचित घडत असत आणि असे प्रकार घडले तरी पोलिसांकडे जाण्यास समाजातील कोणालाही भीती वाटत नसे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज परिस्थिती अशी झाली आहे की, गुंडांचे अत्याचार परवडले पण पोलिस चौकीतील अत्याचार नकोत.

 स्वातंत्र्यानंतर स्त्रियांची काही बाबतीत प्रगती झाली आहे आणि त्यांचे आयुष्य अधिक सुखमय झाले आहे. पण, त्याचे कारण शासन किंवा शासकीय नीती नसून तंत्रज्ञानातील प्रगती आहे. शिवण्याचे यंत्र, पिठाची गिरणी, पाण्याचे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३२