पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/63

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंधने इतिहासाच्या एका अवस्थेत स्त्रियांनी का स्वीकारावी याचे समाधानकारक विश्लेषण मार्क्सवादात मिळत नाही. स्त्री-स्वातंत्र्याचा विचार हे मार्क्सवादाने लावून घेतलेले मातीचे कुल्ले आहेत. ते टिकून राहण्यासारखे नाहीत आणि मार्क्सवादाची आर्थिक क्षेत्रात पीछेहाट होत असताना या बुडत्या जहाजात चढण्याची स्त्री-आंदोलनाला काही आवश्यकताही नाही.


 (ब) आधुनिक स्त्रीवाद्यांचा मतप्रवाह
 स्त्रियांच्या सद्य:स्थितीचे आणि समाजातील दुय्यम दर्जाचे कारण काय? आणि वेगवेगळ्या समाजातील स्त्रियांच्या दर्जातील फरकाचा अर्थ कसा लावायचा? आणि याहून शेवटी, स्त्रियांच्या समस्येचे उत्तर काय? हे प्रश्न गेल्या वीस एक वर्षांतच आग्रही स्वरूपात मांडले जाऊ लागले. स्त्रियांची चळवळ सुरुवातीच्या काही काळात सुधारणवादी पुरुषांच्या हाती होती. दयाबुद्धीने आणि करुणेने प्रेरित होऊन अभागी अबलांची परिस्थिती सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १९६५ सालापासून स्त्री-मुक्ती चळवळीचे नवीन युग सुरू झाले असे समजले पाहिजे. इथपासून चळवळ प्रामुख्याने स्त्रियांनी स्वत:च हाती घेतली आणि अनेक वर्षे कोंडून ठेवलेली वाफ बाहेर उफाळून यावी त्याप्रमाणे या काळात स्त्रियांनी स्त्री म्हणून अत्यंत मोकळेपणे स्त्रियांच्या प्रश्नाची अनेक अंगे व विश्लेषणे विस्ताराने आणि अभ्यासपूर्वक मांडली. मार्क्सवादाची चौकट स्त्रियांच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही हे त्या चळवळीच्या नवीन प्रवर्तकांनी अगदी ठामपणे मांडले आणि आपले नवे सिद्धांत पुढे ठेवले.
 एका अर्थाने मार्क्सवादाच्या आधीच्या "आदर्शवादी" किंवा "विधायक" साम्यवादी चळवळींशी १९६५ च्या आधीच्या चळवळींची तुलना करता येईल. १९६५ पासून शास्त्रीय स्त्री-मुक्तीचा विचार उमलू लागला आहे. हा विचार पुढे मांडणारांमध्ये शुलामिथ फायरस्टोन यांचा क्रमांक खूपच वरचा लागेल. मार्क्सवादाला समांतर अशा अनेक संकल्पना तिने मांडल्या. उदाहरणार्थ, आर्थिक वर्गाप्रमाणे लिंगवर्ग, ऐतिहासिक वस्तुवादाचाही अर्थ, लिंग विभागणीच्या आधारावर इतिहासाचा अर्थ समजून घेणारी विचारपद्धती इत्यादी.
 १९७० साली केट मिलेटने एका शब्दाचा प्रयोग केला आणि तो लवकरच रूढ झाला. "पितृसत्ताक". पितृसत्ता म्हणजे लष्करी, औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, राजकीय, वित्तीय या सत्तांच्या सर्व स्रोतांचे पुरुषांच्या हाती एकवटणे. पितृसत्ता म्हणजे वडिलांची किंवा बापाची सत्ता-

 जिच्यात समाजाची, कुटुंबाची सैद्धांतिक आणि राजकीय व्यवस्था ही

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न /६१