पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/73

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसेच हरले, जिंकले कोणीही, तरी स्त्रियांची सदैव पीछेहाटच झाली. जेती समाजातील पुरुषांना काही लाभ मिळाला असेल आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या अंगावर काय लुटीतले अलंकार आणि वस्त्रे चढली असतील ती असोत, जेते राष्ट्रेही असुरक्षिततेच्या वातावरणाचे बळी झाली. जेत्या राष्ट्रांतही पुरुषांचे प्रमाण कमीच झाले. जेते आणि जित दोन्हीपक्षी हिंसाचाराला तोंड देण्याची तयारी एकाच पद्धतीची. त्यामुळे दोन्ही समाजांतील स्त्रियांचा प्रत्येक लढाईत पराभवच होत गेला.


 स्त्रियांचा प्रश्न
 वरकड उत्पादनाच्या सुरुवातीपासूनच मनुष्यसंस्कृतीला ग्रहण लागल्यासारखे झाले. पशुंनासुद्धा लाजवतील अशा तऱ्हेच्या लक्षावधी क्रूर कथांनी आणि शेकडो स्त्रियांच्या अश्रूंनी हा काळ भरलेला आहे. यथावकाश लुटारूही राज्ये, साम्राज्ये स्थापून स्थिर झाले. वरकड उत्पादनाच्या उपलब्धीमुळे आणखी एका चमत्काराला सुरुवात झाली. शास्त्र आणि विज्ञान यांच्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होऊ लागला. पहिल्या औद्योगिकीकरणापेक्षा दुसऱ्या औद्योगिकीकरणाचे तंत्रज्ञान वेगळे आणि तिसऱ्या पिढीतील त्याहून वरचे अशा झपाट्याने तंत्रज्ञानाची प्रगती होऊ लागली. एका काळी मँचेस्टरच्या कापडगिरण्यांना संरक्षण मिळावे म्हणून विणकारांचे अंगठे क्रूरतेने कापणारे आता कापड तयार करण्याबद्दल उदासीन झाले. त्यापेक्षा कापड बनविण्याची यंत्रे तयार करणे त्यांना जास्त आकर्षक वाटू लागले. आता त्यांना गरज होती, कापड विकत घेणाऱ्यांची नव्हे तर कापड तयार करणारी यंत्रे विकत घेणाऱ्यांची. जुन्या वसाहतवादाची उपयुक्तता संपली. त्यामुळे गोऱ्या वसाहतवादाचा अंत झाला. प्रत्येक वसाहतीतील साम्राज्याच्या काळात परकीयांशी सहकार्य करणाऱ्या मंडळींच्या हाती सत्ता जाऊन देशोदेशी स्वातंत्र्याचे नवे झेंडे लागले आणि काळ्या वसाहतवादाची सुरुवात झाली. नव्या सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रीय नियोजन, समाजवाद, आर्थिक विकास, 'गरिबी हटाव', शास्त्र आणि विज्ञान, एकविसावे शतक अशा फसव्या नावाखाली परदेशातील नवी यंत्रसामग्री आणि वरकड उत्पादन यांची खरेदी पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणावर सुरू केली. मँचेस्टरची धन चालूच राहिली वर मुंबईकलकत्त्याची भर पडली. शेतीतील वरकड उत्पादनाची लूट करणारे आता लुटल्या जाणाऱ्यांच्याच रंग रूपाचे आहेत एवढाच काय तो फरक. जित आणि जेते यांचे स्वरूप आता 'भारत' आणि 'इंडिया' असे झाले.

 असुरक्षिततेचे जनक फक्त बदलले

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७१