पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/8

हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी महिलांच्या वतीने चार शब्द



 शेतकरी महिला आघाडीच्या वेगवेगळ्या सखोल मांडणीचे एका पुस्तकात रूपांतर म्हणजे समस्त महिला प्रश्नांची एकत्रित स्वरूपात उकल होणे होय. या प्रश्नांच्या अभ्यासात सरसकट सर्व स्तरांतील स्त्रीला व शेतकरी स्त्रीला केंद्रबिंदू गृहीत धरले आहे. "स्त्री आणि तिचे प्रश्न" हे समीकरण १९८४-८५ पर्यंत सर्व स्तरांतील स्त्रियांकरिता, विशेषतः शेतकरणी (गृहिणी) करिता त्यात काही अपेक्षित नव्हते. याचा अर्थ स्त्रीप्रश्नाचा अभ्यासच झाला नाही असे नव्हे. मात्र जो काही अभ्यास झाला तो प्रामुख्याने कामकाजी स्त्रियांच्या व मजूर स्त्रियांच्या प्रश्नांचाच झालेला आढळतो. मार्क्सने स्त्री प्रश्नाच्या केलेल्या मांडणीत ग्रामीण गृहिणी कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे स्त्रीचे काही वेगळे प्रश्न असतील याची जाण आम्हा स्त्रियांनादेखील नव्हती.

 १९८४-८५ साली शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जेव्हा गावागावात जायला लागलो आणि शेतीमालाच्या रास्त भावाचा प्रश्न मांडायला लागलो तेव्हा असे वाटत असे की ही आर्थिक प्रश्नांची लढाई जिंकलो की आपले प्रश्न सुटतील, सभेला येणारी स्त्री ही आर्थिक सधनता आल्यावर चांगलं आयुष्य जगू शकेल. याच काळात स्त्रियांच्या बाजूने पगारवाढीकरिता काही महिला संघटना लढा देत असत तर काही संघटना हुंडाबळी, घटस्फोट, बलात्कारासारखे प्रश्न घेऊन रस्त्यावर येत असत. हुंडाबळी, घटस्फोट हे वैयक्तिक प्रश्न आहेत म्हणून सर्वसामान्य ग्रामीण स्त्री या प्रश्नांकडे जवळिकीने बघत असलेल्या आढळत नव्हत्या. अशा स्थितीत दोन पैसे हाती आले म्हणून आम्ही स्त्रिया सुखी झालो नाहीत, उलट दारुची बाटली घरी आली व आमचा मार वाढला अशा आशयाची मांडणी स्त्रिया करू लागल्या तेव्हा आर्थिक प्रश्नांपेक्षाही वेगळे प्रश्न सामान्य स्त्रियांचे आहेत याची जाणीव झाली. चांदवडच्या शिदोरीत हे प्रश्न खऱ्या अर्थाने समोर आले. समग्र महिला आघाडीने एकत्रितपणे या प्रश्नांची उकल

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७