पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/88

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्पादन झाल्याखेरीज फारसे संभवत नाही. शेतीतील बचतीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात बैल नांगराला जुपल्यानंतरच झाली असावी. काही ठिकाणी बैलाच्या जागी गुलामही वापरले गेले असतील. पण सर्वसाधारणपणे पशुपालन आणि शेती या दोघांतील विकासात फार मोठ्या काळाची तफावत संभवत नाही.
 वरकड उत्पादन थोड्याफार काळाच्या फरकाने शेतीत तयार झालेले असो की पशुपालनात असो आणि लुटीची सुरुवात वरकड उत्पन्न खऱ्या अर्थाने तयार होऊ लागले तेव्हापासून असो, का खळ्यात धान्याची रास पडू लागल्यापासून असो मध्ययुगातील आणि सरंजामशाहीतील लुटालुटीचा कालखंड शेतीच्या उत्पादनाशी संबंधित आहे व स्त्रियांची गुलामगिरी ही या लुटालुटीस तोंड देण्याकरिता उभी केलेली आपत्कालीन व्यवस्था होती यात काही शंकेला जागा नाही. तात्पुरता वाटणारा आपत्काळ हजारो वर्षे टिकला. किंबहुना, आजपर्यंत मानवी इतिहास आणि संस्कृती म्हणून जे जे ओळखले जाते ते या लुटीशी संबंधित आहे. स्त्रियांनी अनपेक्षित संकटाला तोंड देण्याकरिता एक ओझे स्वीकारले पण सिंदबादच्या सफरीच्या गोष्टीतील म्हाताऱ्याप्रमाणे, ते ओझे हजारो वर्षे झाली, खाली उतरायलाच तयार नाही.
 चांदवड अधिवेशनानंतर महिला चळवळ मार्क्सवादी विचारापासून दूर सरू लागली. रशिया व चीन येथील घटनांमुळे मार्क्सवादी विचाराची एकूणच पकड ढिली झाली. व्यावसायिक मार्क्सवादी पुऱ्या निष्ठेने बेजिंगमधील गोळीबाराचेसुद्धा समर्थन करू लागले, पण सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या मार्क्सवाद्यांना काही पर्याय शोधणे आवश्यक वाटू लागले. त्याप्रमाणेच काही मार्क्सवादी पठडीतील स्त्रीकार्यकर्त्यांनाही पर्यायी विचार शोधणे आवश्यक झाले.
 स्टॅलीनच्या हत्याकांडानंतर रशियन व्यवस्थेला उबगलेल्या कोस्लर, मानवेंद्रनाथ रॉय या विचारवंतांप्रमाणे त्या स्त्रीकार्यकर्त्यांचीही स्थिती झाली. मार्क्सवादाचा पराभव त्यातील चुकीच्या आर्थिक व सामाजिक गृहीततत्त्वात व विश्लेषणपद्धतीत आहे. याउलट, मार्क्सवादाची इतिहास-विश्लेषणाची वस्तुवादी मीमांसा आजही अबाधित राहिली आहे. मार्क्सवादाच्या पाडावाने भांबावून गेलेल्या विचारवंतांनी मार्क्सवादातील वाईटाबरोबर चांगलेही फेकून देऊन काही असंबद्ध विचारसरणी मांडायला सुरुवात केली आहे व ही नवीन विचारसरणी जणू काही एक क्रांतिकारक परिवर्तन आहे असेही नगारे वाजवायला सुरुवात केली आहे.

 स्टॅलीनच्या शेतकी धोरणामागे मार्क्सवादातील वरकड मूल्याची चुकीची मीमांसा आहे. याविषयी गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी अध्यात्माकडे पावले

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८५