पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोहा जो न वळे, ढळे न अथवा निंदास्तुतीच्या बळे,
आचारास विचार मित्र ह्मणती ज्याच्या प्रयत्नें मिळे,
लालेनेंच हवी तशी नटवुनी ही देशभाषा नटी
लावी पंडितही तदीय भजनी जो मोठमोठे हटी; १०

रूढींच्या दरडी असंख्य असतां मार्गांत चोहीकडे
धैर्ये चालविता सुधारकचमू जो वीर झाला पुढे,
त्या गोपाळ गणेश आगरकरा आर्यप्रदीपासही
काळे मालवुनी तमोमय अहा ! केली पुन्हा ही मही; ११

जेणे पाहुनि गर्वभार हरिला वाक्संगरी आपला
'मालाकार' हि हार घेउनि ह्मणे हा-'वाद नाहीं भला.'
नेतां गोंडवनांतुनी रघुवरा निर्वेध रामेश्वरी
स्पर्धा वीर कुरुंदवाडकरही ज्याच्या यशाची करी, १२

होता कोण मुकुंदराज ? हाणते ज्ञानेश्वरी काय ती?
आहे गोड सुधारसाहुनि किती मुक्तेश्वराची कृती?
विप्री नेउनियां बळे बुडवितां नाहीं बुडाली जळी,
एक्याची अजरामरा कृति अशी होऊनि कां राहिली? १३

नाम्या होउनि नामदेव बसला लोकांत कोण्या गुणें?
घालावी ह्मणती जनीस कवि का साष्टांग लोटांगणें?
तोंडी संतत दासबोधवचनें कां आमच्या राहती?
झाला देशहितार्थ काय करिता तो जावळीचा यती? १४

ब्रह्मानंदभरी नरां नरवरां दिंडी पताका करी
घ्याया लावुनि नाचवीत असतां त्या वाळवंटावरी,
श्री वैकुंठपुरी करोनि दुसरी जो दाखवी पंढरी,
वाणी काय अशी अलौकिक असे त्याही तुक्याची तरी? १५

कैसी पाजुनि वामनें नवरसां ही पुष्ट केली गिरा?
का तो श्रीधर पात्र होउनि वसे सर्वत्र लोकादरा?
वाग्देवीप्रति नाचवीत असतां बारामतीचा शिखी,
चेतोवृत्तिहि नाचतात ह्मणती कां आमच्या पारखी ? १६

आहे वाङ्मय आपलें नवरसी ओथंबलें हें किती?
लोकां बोधहि काय काय करिती त्या पूर्वजांच्या कृती?-
आह्मां सर्वहि काव्यसंग्रहमिषे हें जो सुधी दाखवी,
गेला* वामनराव ओक विलया तोही कवींचा कवी! १७


 * वामन दाजी ओक.