पान:चित्रा नि चारू.djvu/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "चित्रा, तू पण पड. आणि गेलीस झोके घ्यायला, तर फार उंच नकोस हो झोके घेऊ." पिता म्हणाला.

 बळवंतरावांनी वामकुक्षी केली. चित्राही जरा तेथे लवंडली. जहागीरदारही बाहेर झोपले. चारू मात्र मळ्यात होता.

 थोड्या वेळाने चित्रा उठली. ती मळ्यात गेली. झाडाला बांधलेला झोका तिला दिसला. ती तिकडे गेली. झोक्यावर झोके घेऊ लागली. परंतु तिला भीती वाटत होती. इतक्यात चारू तेथे आला. तिचे झोके थांबले. ती खाली उतरली.

 " उतरलातशा ?" त्याने विचारले.

 "तुम्हाला खूप उंच नेता येतो का हो ?"

 " हो."

 "मला दाखवा बरे."

 चारू झोक्यावर चढला आणि हळूहळू त्याने खूपच उंच झोका नेला. शेवटी तो खाली आला.

 " मला नेता येईल का इतका उंच ?"

 " हो."

 " पडायची नाही ना ? ”

 "पडल्यात तर मी आहे ना ? "

 "पडल्यावर तुमचा काय उपयोग?"

 "लहान लहान मुलेही खूप उंच नेतात."

 चित्रा पुन्हा चढली झोक्यावर, ती झोका खूप उंच नेऊ लागली.

 "शाबास, शाबास !" चारू म्हणाला.

 तिने आणखी वर नेला. परंतु ती लटपटली, तिला का घेरी आली ? तिचा हात सुटला. चित्रा खाली पडली. ती ओरडली. तिकडे गडी-माणसे होती, ती धावत आली. चित्राला बरेच लागले. कपाळाला एक दगड लागला. रक्ताची धार लागली. कोपर बरेच खरचटले. बळवंतराव, ते जहागीरदार, सारे तेथे गजबजून आले. एका गड्याने कसला तर पाला आणला, भांबुरडीचा पाला. हातावर चोळून तो त्याने चित्राच्या कपाळावर बांधला. रक्त थांबले.

चित्रेचे लग्न * २३