पान:चित्रा नि चारू.djvu/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "चित्रा, कोठे शिकलीस असे बोलायला ?"

 "तुझे प्रेम शिकवते. तुझा फोटो मला शिकवी."

 "तू इतकी अशक्त कशी झालीस ? "

 "तू येथे नव्हतास म्हणून. तुझे दर्शन म्हणजे माझा खरा आहार. तुझे दर्शन म्हणजे अमृत. तू येथे असलास म्हणजे मला अन्न गोड लागते. तू नसलास म्हणजे सारे कडू वाटते. घास जात नाही मग. म्हणून हो मी अशक्त झाल्ये."

 " तुला मी टॉनिक आणीन."

 " वेडा आहेस तू."

 "तू घेतले पाहिजेस."

 "चारू, माझे टॉनिक तू हो. तू आलास. आता बघ माझी प्रकृती सुधारेल."

 "तरीसुद्धा टॉनिक घे. माझ्यासाठी घे."

 " तुझ्या आनंदासाठी घेईन. चारू, तुझ्यापुढे मला नाही म्हणता येत नाही. तुझी इच्छा म्हणजे माझा धर्म. तुझी इच्छा म्हणजे माझा कायदा."

 "चित्रा, ही गुलामगिरी आहे. तू का माझी गुलाम आहेस ? "

 "वेडा आहेस तू चारू ? फातमा कबीराचे एक गाणे म्हणे. कबीर देवाला म्हणतो,
   'मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा।
    तूं साहेब मेरा ।'

 चारू, रामाचे दास होणे म्हणजेच मुक्त होणे. कधी कधी दास्य म्हणजेच मुक्ती असते, कारण ते दास्य स्वेच्छेचे असते. लादलेले नसते. चारू, तू ज्याला गुलामगिरी म्हणतोस त्याला मी आत्मसमर्पण म्हणते व समर्पण, स्वतःचे समर्पण हेच माझे समाधान. समजले ना ? "

३८ * चित्रा नि चारू