पान:चित्रा नि चारू.djvu/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही गाडी ? येऊ लागली, की लागोपाठ येतात. नोकरीत आजपर्यंत कोण नाव नाही ठेवले मला ! परंतु आज मी नालायक ठरलो. लक्षच लागत नाही. आठवण राहात नाही. सुचत नाही. काय करू मी? भोजू, मला वेड लागेल असे वाटते ! सारखी चित्रा डोळ्यांसमोर येते."

 "धनी, सारे चांगले होईल. धीर नका सोडू."

 "मला वेड लागले, तर भोजू, तू या सर्वांची काळजी घे हो."

 "परंतु वेड लागणार नाही धनी."

 "परंतु मला कबूल कर, तू नाही ना सोडून जाणार ? सध्या आम्हाला साडेसाती आली आहे. तू नको हो सोडून जाऊ. भोजू, आमच्याजवळ पैसेही फार नाहीत. मी लांचलुचपत घेतली नाही. जो कोणी मदत मागेल त्याला नाही म्हटले नाही. कितीतरी शेतक-यांना मी पैसे दिले. त्यांच्या लग्नांना दिले. अरे त्यांचेच पैसे. मी उपकार केले असे नाही मी म्हणत. हिला एक चार दागिने केले तेवढेच. उद्या मी वेडा झालो तर कसे व्हायचे ? मुलांचे शिक्षण कसे व्हायचे ? भोजू, तू यांना सोडू नको हो. कबूल कर."

 " नाही हो सोडणार. काही कमी पडू देणार नाही. माझे तिकडे माझ्या मुलुखात घरदार आहे. थोडी शेती आहे. वेळ आली तर ते मी विकीन, परंतु सांभाळीन सर्वांना, तुम्ही काळजी नको करू. परंतु सारे चांगलेच होईल, काळजी नका करू. चित्राताई भेटतील, त्यांचे यजमान भेटतील"

 घरात आता आनंद नव्हता. सारी सचित होती. सोताबाई रडत बसत. बळवंतराव भ्रमिष्टासारखे करीत. श्यामू, रामू, दामू आईजवळ बसत. त्या मुलांना रडू येई.

 आई, बाबा कधी होतील बरे ? " श्यामू विचारी.

 "चित्राताई आली तर बरे होतील." ती सांगे.

 "आम्ही जाऊ शोधायला ?" ती मुले विचारीत.

 "तुम्ही लहान आहात रे." ती म्हणे,

 "सीतेला शोधायला वानरसुद्धा गेले. आम्ही तर माणसे." श्याम म्हणे.

चित्राच्या वडिलांना वेड़ लागते * ५५