पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्याभोवती, आपल्या कुटुंबात, आपल्या पाल्याच्या मुलांच्या भावविश्वात, त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलेले असते याचा आपल्याला पत्ताही नसतो. कदाचित आपल्यामुळे किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे इतर सर्वांनाच - विशेषत: मुलांना एका विशिष्ट प्रकारच्या ताणयुक्त वातावरणात जगावे लागते याचा साधा विचारही आपण केला नसेल. आपली मुले हुशार व्हावीत, सुसंस्कारित व्हावीत असे प्रत्येक आईबापाला वाटत असते. पण त्यासाठी आईवडिलांनी स्वत:वर काही निर्बंध घालून घ्यावयाचे असतात हे त्यांच्या गावी नसते. त्यांना वाटते की, आपण मुलांचे चांगले संगोपन करत आहोत. मुलांचे चांगल्या रीतीने संगोपन करायचे असेल तर आपले मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे आधी मान्य करावे. आपल्या पाल्याचा आदर करावा. हे एकदा आपण पक्के लक्षात ठेवले की इतर अनेक पालकांसारख्या चुका आपल्या हातून घडणार नाहीत. अनेक पालक मुलांना प्रत्येक छोट्या-मोठ्या चुकांसाठी शिक्षा देण्याची चूक करीत असतात. मुलांना कोंडून ठेवणे, त्यांच्याशी अबोला धरणे या शिक्षेच्या अत्यंत निकृष्ट प्रथा आहेत. अशा शिक्षेमुळे मुलांच्या मनांत वेगळी भावना निर्माण होऊ शकते. आपण घरात कोणाला आवडत नाही अशी त्यांची धारणा होऊ शकते. घराबद्दल असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. या घरात आपण सुरक्षित आहोत आणि हे घर आपलेच आहे असे मुलांना वाटायला हवे. बरेच पालक आपल्या मुलाची तुलना इतरांच्या शेजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या मुलाशी करतात आणि या तुलनेमुळे एखाद्या बाबतीत आपला पाल्य मागे पडत असेल तर त्याला वाईट बोलतात, टोमणे मारतात; कुचकट बोलतात. अशा वागण्यामुळे मुले स्वत:ला कमी लेखू लागतात. लहान मुलांना प्रेम व सुरक्षितता यांची गरज असते. विशेषत: वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत तर मुले अतिशय संस्कारक्षम असतात. पालकांचे वागणे हे अगदी टीपकागदासारखी ती टिपून १०२ । जगण्यात अर्थ आहे..