पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेतात. पालकांच्या वागण्या-बोलण्यावर त्यांचे सतत लक्ष असते. पालकांनी आपल्याशी बोलावे, आपले मनोगत समजून घ्यावे, आपल्या बारीक-सारीक अडचणी - काळज्या - चिंता समजून घ्याव्यात असे त्यांना वाटत असते. यासाठी पालकांनी मुलांची मनोगते ऐकणे आवश्यक असते. आजकाल बहुसंख्य पालकांना मुलांसाठी वेळ देण्यापेक्षा पैसे-वस्तू देणे अधिक सोपे वाटते. पैसे स्वस्त आणि वेळ मात्र महाग अशी काहीशी अवस्था आज झाली आहे. ऐकणे हा एक दुतर्फी व्यवहार असतो. पालकांनी मुलांचे ऐकले तरच मुले पालकांचे ऐकतील हे पालकांनी पक्के लक्षात ठेवायला हवे. आम्ही सांगू तेच व तेवढेच मुलांनी ऐकले पाहिजे, आम्ही मात्र त्यांचे ऐकणार नाही ही अधिकारशाही मनोवृत्ती आजच्या लोकशाहीयुगात टिकणार नाही. असे हुकमशहा पालक आपल्या मुलांना विश्वासात घेत नाहीत. मुलांच्या लहान- सहान तक्रारींकडे लक्ष न देता त्यांची मुस्कटदाबीच करत असतात. एवढेच नव्हे तर, 'हम करेसो कायदा' या उक्तीप्रमाणे आपलेच म्हणणे त्यांच्यावर लादत असतात. यावरून एक विनोद आठवला. अशाच एका घरात वडील आणि त्यांचा मुलगा जेवत असतात. वडिलांची कडक शिस्त. 'जेवताना बोलायचे नाही' हा त्यांचा नियम. जेवत असताना त्यांचा मुलगा वडिलांना काही तरी सांगायचा प्रयत्न करतो. पण वडील त्याला खुणेनेच दटावतात आणि जेवण झाल्यावर पोटावर हात फिरवीत विचारतात, “बोल, मघाशी काय सांगणार होतास?" मुलगा उत्तरतो, "बाबा, मघाशी आपला पिंट्या विहिरीत पडलाय. त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्हांला सांगत होतो." कडक शिस्तीमुळे असेही घडू शकते. मुलांवर आपली मते जबरदस्तीने लादण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन एखाद्या गोष्टीबद्दल सविस्तर समजावून सांगावे. मुलांना शिस्त हवी, घरात नियम हवेत, काटेकोरपणा हवा या रास्त मुलांना मुठीत नको; मिठीत ठेवा । १०३