पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूमिकेसाठी बरेच पालक त्याचा अतिरेक करतात. शिस्तीचे नियम हे मुलांना अनेक प्रकारे मार्गदर्शक व उपयुक्त ठरणारे असतात याबद्दल दुमत नाही. मुलांना स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविण्यास हे नियम उपयुक्त ठरतात. मुलांना अनिष्ट वर्तनापासून परावृत्त करायला लावण्याची ताकदही या नियमांमध्ये असते. असे नियम प्रत्येक घरात, कुटुंबात असायला हवेत; त्याशिवाय उद्याचा जबाबदार नागरिक या देशात तयार होणार नाही, हे खरे आहे; पण अशा नियमांना एक प्रकारची मर्यादा पालकांनी घालून द्यायला हवी. नियमांचे उल्लंघन केल्यास ठरावीक किमान शिक्षेची तरतूदही असायला हवी आणि अशा नियमावलीची माहितीदेखील आधी मुलांना द्यायला हवी. कारण नियमांचे उल्लंघन केल्यानंतर शिक्षा मिळते हे मुलांना म पाहिजे. अर्थात प्रत्येक नियमाचा अर्थ मुलांना स्पष्ट व्हायला हवा. या सर्व गोष्टी पालकांनी डोळसपणे समजून घ्यायला हव्यात. 'आमच्यावेळी असं होतं, आता ते राहिलं नाही. आम्हांला अमुक अमुक मिळालं नाही, आता मुलांना तमुक तमुक हवं. आम्ही एवढं सोसलं, आता एवढंसं बोललो तर कार्टी रुसतात. आमचा बाप आमच्याशी बोलत नव्हता. आता पोरंबी बोलत न्हाईत. आमीच यांची समजूत घालायची. आमच्या आईबाबांनी आमची काळजी केली नाही, आम्हीच आमच्या पायावर उभे राहिलो. आता मुलांना उभं करण्यासाठी आमचेच पाय दुखवून घ्यायचे. मुलगा काय शिकतोय हे आमच्या बाबाला माहीत नव्हतं. आता आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आम्हीच धावाधाव करायची? आमचं सँडविच झालंय हो!' आजच्या पालकांची ही अशी कैफियत जागोजागी कानांवर पडते. काळ बदलला. परिस्थिती झपाट्याने बदलली. परिसर त्याहून वेगाने बदलला. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत चालली; कारण आमिषे वाढली. मनोरंजनाच्या साधनांनी अक्षरश: आक्रमण केले. 'पूर्वी अभ्यास एके अभ्यास' हा मंत्र विद्यार्थ्यांसमोर असायचा. हा 'मंत्र' कुठेतरी लुप्त होत चाललाय. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर यात रस घेऊ पाहणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीस १०४ । जगण्यात अर्थ आहे..