पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या स्क्रीननी म्हणजे पडद्यांनी वेड लावलंय. या पडद्यांनी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये पडदा निर्माण केलाय. या खेळण्यांनी केवळ आयुष्य व्यापून टाकलं नाही, तर आयुष्याचा खेळ करून टाकलाय. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ही खेळणी खेळणीच राहू द्यावीत. या 'टेक्नॉलॉजी' च्या हातचे 'खेळणे' बनू नये. टीव्हीचा रिमोट आपल्या हाती असावा. आपला रिमोटकंट्रोल त्यांच्याकडे असू नये. यासाठी आपण गांभीर्याने विचार करायला हवा. पालकांनी टीव्ही, मोबाईल, इंटरनेटचे फायदे-तोटे मुलांना समजावून सांगायला हवेत. केवळ 'हे नको, ते नको' ची नकारघंटा नको. काही मुलांचा कल शिस्त आणि नियम झुगारून देण्याकडेही असतो. अशा वेळेस उधळू पाहणाऱ्या घोड्याला वेळीच लगाम घालण्याचे काम पालकांकडून कौशल्याने व्हावे लागते. उठताबसता लाथाबुक्क्या या धोरणाने वागणाऱ्या पालकांचे नियम मुलांना शिस्त लावण्यास उपयुक्त ठरत नाहीत. कारण मुलांना सतत वेठीला धरून चालत नाही. वेठीला धरल्यामुळे शिस्त लागण्याऐवजी त्यांच्या स्वभावाला अनिष्ट वळण लागू शकते. एकदा एका कडक पालकाने आपल्या मुलावर कडक शिस्त लादली. 'काहीही झाले तरी पहाटे पाच वाजता उठून अभ्यास केलाच पाहिजे' असे त्याने मुलाला बजावले. मुलगा काही विशिष्ट परिस्थितीत किंवा शारीरिक तक्रारीमुळे उठू शकत नाही हे पालकाने समजावूनच घेतले नाही. मुलाने ही गोष्ट समजावून द्यायचा प्रयत्न केला पण पालकानेच ते मनावर घेतले नाही. त्याची कडक शिस्त कायम. एकच घोकंपट्टी. नियम म्हणजे नियम. अर्थात याचा परिणाम असा झाला की, तो मुलगा पहाटे पाच वाजता उठून, खोली आतून बंद करून दिवा लावायचा आणि खुशाल झोपी जायचा. पालक भ्रमात राहिला की, मुलगा अभ्यास करतोय. पण पुढेपुढे हाच मुलगा निर्ढावला. खोटे बोलून अनेक गैरमार्ग अवलंबू लागला हे या पालकाच्या गावीही नव्हते. पालकाच्या अतिशिस्तीमुळे मुलाला वाईट वळण लागले होते. मुलावर चांगले संस्कार करणे म्हणजे आपल्या अंगचे चांगूलपण त्याच्यात भिनणे होय. मुलांना मुठीत नको; मिठीत ठेवा | १०५