पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एखाद्या व्यक्तीला वरीलपैकी एखादी सवय असेल तर ती व्यक्ती व्यसनी आहे किंवा व्यसनी होत आहे, होणार आहे हे आधी लक्षात घ्यावे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मादक पदार्थाचा वारंवार वापर करू लागते आणि त्यामुळे काही काळानंतर त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, आर्थिक घडी विस्कटते, सामाजिक स्थान डळमळीत होते, कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होते अशा स्थितीला 'व्यसन' असे म्हणतात. संस्कृतमध्ये व्यसन या शब्दाचे दुर्दैव, संकट, नाश, सर्वनाश, गुन्हा, पाप, अपावित्र्य, वाईट सवय, अनीती, धर्मापासून व्यक्तीला दूर नेणारी गोष्ट असे अनेक अर्थ आहेत. आयुष्यात अर्थ नाही म्हणून पिणारे आहेत; आयुष्याला अर्थ यावा ( प्रतिष्ठा मिळावी) म्हणून पिणारे आहेत, आर्थिक टंचाई आहे म्हणून पिणारे आहेत, अर्थ (अर्थात पैसा) अधिक आहे म्हणून पिणारे आहेत... माणसाला व्यसन का जडते यावर अनेक संशोधने झाली. यातून वेगवेगळे निष्कर्ष निघाले. ज्या व्यक्तींची आई किंवा वडील यांच्यापैकी कुणीतरी एक मद्यपी असते त्यांना व्यसन जडण्याचे प्रमाण इतरांपेक्षा पस्तीस पट अधिक असते. काही व्यक्तींमध्ये जनुकांशी निगडीत असा म्हणजे गुणसूत्रदोष जन्मजात असतो. त्यामुळे व्यसनाधीन होण्याची प्रवृत्ती उपजत अंगी असते. आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर त्या व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतात. अंगात नैसर्गिक प्रवृत्ती नसतानासुद्धा मद्य किंवा मादक पदार्थाच्या सहज आणि अत्यल्प किंमतीतील उपलब्धतेमुळे व्यसन जडू शकते. शिक्षणाचा अभाव आणि वाईट लोकांची संगत ही व्यसन लागण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पण असे असूनही आज बरीचशी शिक्षित मंडळी व्यसनाधीन झालेली दिसून येतात. प्रसारमाध्यमांचा परिणाम म्हणून- विशेषत: टीव्ही सिनेमातील अतिरेकी प्रदर्शनामुळे लहान ११४ । जगण्यात अर्थ आहे..