पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसं, त्यांची मनं, मनाचे रंग, त्याच्या छटा, मनाची श्रीमंती... या अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरतो. कधी कळत, तर कधी नकळत. घर म्हणजे घरातल्या व्यक्ती, घरपण म्हणजे घरातील व्यक्तींचे एकमेकातील सामंजस्य, हे आपल्यापैकी अनेकांच्या गावीही नसते. घर सुंदर करण्याच्या प्रयत्नांत या व्यक्ती इतरांच्या मनापासून कित्येक योजने दूर गेलेल्या असतात. सुंदर दिसणाऱ्या काही घरांत घरपण नावाची गोष्टच नसते. अशा घरांतील एक किंवा अनेकजण घरपण नाहीसे होण्यास कारणीभूत असतात. अशा व्यक्ती बऱ्याचदा सुशिक्षित, कर्तव्यदक्ष, यशस्वी असतात. त्यांचे घराबाहेरचे वागणे कौतुकाचे, मौजमजेचे असते. मित्रमंडळी भरपूर असतात. घराबाहेर हसतखिदळत वावरणारी ही माणसे स्वत:च्या घरात गेल्यावर मात्र मख्ख होतात. एकमेकाशी बोलेनाशी होतात. विचारांना गुंगी आल्याप्रमाणे वागतात. मनावर ओझे असल्यासारखी वागतात. का? कशासाठी? , गैरसमज, बऱ्याचदा याचे कारण असते, अपेक्षा आणि अपेक्षाभंग, संवादाचा अभाव, एकमेकांना गृहित धरणे, स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे, इतरांच्या मनाचा विचार न करणे. माझ्या बायकोने असेच वागायला हवे. माझ्या नवऱ्याने इथेच जायला हवे. माझ्या मुलांनी हेच करायला हवे. माझ्या मुलांनी अमुकच शिकायला हवे. मी यांच्यासाठी एवढे करतो, तर माझ्या मनाप्रमाणेच सारे घडायला हवे. मी कमावता झालोय, आता आईबाबांनी शांत बसून खायला काय हरकत आहे? माझी बायको नोकरी करते, राबते... आईला दोन गोष्टी बोलली म्हणून काय झाले? एखादा शब्द चुकून गेला म्हणजे हात-पाय मोडले की काय ? सूनबाईला दोन भल्या गोष्टी सांगितल्या तर बिघडले कुठे? मला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण ? माझा मित्र यांच्यापेक्षा कित्येक पटीने समंजस आहे. माझ्या मैत्रिणी मला समजावून घेतात. मी घरातल्या प्रत्येकासाठी इतकं सारं सहन करते, कष्ट करते; पण माझी कुणाला किंमतच नाही... घरातले हे आणि असे अनेक (वि) संवाद घराबाहेर (किंवा फक्त घराबाहेरच ) ऐकायला मिळतात. घरातल्या कोणाला याचा पत्ताही नसतो. अशा व्यक्ती मात्र एका वेगळ्या ताणाखाली १२० । जगण्यात अर्थ आहे..