पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वावरत असतात. या व्यक्तींना घरात कोणता ना कोणता मानसिक ताण छळत असतो. या व्यक्तींचा ताण घरातल्या इतर व्यक्तींच्या आनंदावर विरजण टाकत असतो. अशा व्यक्तींच्या आयुष्याच्या सायंकाळी, कधी कधी 'मध्यान्ही' हृदयविकार, रक्तदाब यांसारखे विकार गाठतात. प्रश्न वाढत राहतात. झगडा वाढत राहतो- मनाचा मनाशी. व्यक्तींचा व्यक्तींशी कधी स्पष्ट कधी अस्पष्ट कधी दृश्य, कधी अदृश्य. असे काही आपल्या घरात घडत नाही ना, याची आधी खात्री करून घ्यावी. तसे काही घडत असेल आणि आपले घर सुंदर बनवायचे असेल तर आपण घरातल्या व्यक्तींनी आधी माणूस बनावे. माणूस बनताना आपल्यातला अहंकार हा भाव सोडून द्यावा. हे करताना घरातल्या कोणत्याही व्यक्तीला गृहीत धरू नये. कोणाकडूनही कोणतीही किमान अपेक्षा धरू नये. घराबाहेरच्या व्यक्तींशी वागताना आपण जसे सावध असतो- कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत बहुधा आपण गोड बोलतो, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून आपण नाटक का पण गोड वागतो. हेच घरी करावे. होय. घरातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलताना गोड असावे, गोड हसावे, गोड बोलावे, गोड वागावे. जमत नसेल तर काही दिवस, काही महिने नाटक करावे. घरातल्या इतर व्यक्तींच्या मानसिक समाधानासाठी नाटक करावे. आपण या प्रकारचे गोड वागणे ठेवले तर काही काळानंतर आपल्याला कळून चुकेल की, आपण (आधी) किती चुकत होतो! आपल्याला समजेल की, घरातल्या इतर व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करतात, आपल्यासाठी किती झुरतात. काही काळानंतर आपलं 'नाटक' हे 'नाटक' राहत नाही. तुम्हांला प्रश्न पडले असतील की, हे असं कसं? आम्ही नाटक का करायचं? काही काळानंतर 'नाटक' हे 'नाटक' कसं बरं राहत नाही? उत्तर सोपं आहे. आपल्या माणसाशी आपला जेव्हा संवाद होत नाही किंवा खूप कमी, कामापुरताच संवाद होतो, तेव्हा एकमेकांच्या मनात काय चाललंय याचा थांग एकमेकाला लागत नाही; आणि 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे वचन सुंदर घर । १२१