पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फळाला येते. “माझ्याबद्दल तुझ्या मनात काय चाललंय कुणास ठाऊक? तू कशाला माझ्याबद्दल चांगला विचार करशील? माझ्याबद्दल तुला काय वाटतंय काही माहीत? आणि माझ्याबद्दल काही वाटणं तरी शिल्लक आहे की नाही कुणास ठाऊक? हल्ली घडाघडा बोलणंदेखील होत नाही तुझ्याकडून ! मीच का माझं मन मोकळं करायचं? तुला आपलेपणा वाटत नसेल तर मी आपुलकी का दाखवावी? माझ्याबद्दल आस्था, प्रेम, माया मनात असती तर हे असं वागणं दिसलं नसतं! तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही..." हे आणि यासारखे असंख्य विचार मनात येत राहतात. आपण आपल्या माणसाशी बोलणेच कमी करतो. हळूहळू बोलणे टाळतो आणि इथेच चुकते. आपण हे सारे नकारार्थी विचार मनातून काढून टाकून, (समजा, निघाले नाहीत तरी) नाटक करायचे. चांगले बोलण्याचे, गोड बोलण्याचे नाटक! तुम्ही एकदा तुमच्या माणसाशी चांगले नि गोड बोलायला लागलात की, त्या व्यक्तीच्या मनातील तुमच्या मनात जसे विचार येते होते, त्यासदृश विचार कमी व्हायला, निघून जायला, मनातील मळभ दूर व्हायला मदत होते. त्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याविषयीची आस्था, प्रेम, माया यांना तुमच्या शब्दांमुळे जाग येते. तिच्या मनाला उभारी येते आणि मग अशी व्यक्ती 'व्यक्त' होऊ लागते. हे व्यक्त होणे मनापासूनचे असते. मनातून असते. आत्म्यापासून असते, आत्म्याचे असते! आपल्या माणसाचे असे बोलणे तुम्ही जेव्हा ऐकता, तेव्हा तुमचे 'नाटक', नाटक राहत नाही. तुमच्या कदाचित लक्षात येणार नाही की, आपले बोलण्याचे नाटक कधीच संपून गेले आहे. आज आपल्यापैकी अनेकांकडे भरपूर पैसा आहे. पण घरातल्या आपल्या माणसांना देण्यासाठी वेळ नाही. प्रत्येकाला थोडा वेळ द्यावा, संवाद साधावा आणि प्रत्येक रात्री निद्रेच्या अधीन होण्याआधी स्वतःशी प्रश्न करावा, 'आज माझा सर्वांशी सुसंवाद झालाय?' याचे उत्तर 'होय' येत राहील तोपर्यंत आपलं घर हे केवळ सिमेंट- वाळूचे घर राहणार नाही, ते खऱ्या अर्थाने 'सुंदर घर' बनलेले असते. १२२ । जगण्यात अर्थ आहे..