पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लावण्यासाठी व बंद करण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नगरपालिका व महानगरपालिका यांना वापरता येणार नाहीत का? आजच्या धकाधकीच्या अन् धावपळीच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपले स्वास्थ्य हरवत चाललो आहोत. प्रत्येकाला कधी ना कधी, काही ना काही, लहान-मोठी व्याधी जडते. अशा वेळी औषधोपचार पूर्णपणे घेतला जात नाही. काही वेळा औषधे शिल्लक राहतात. औषधांच्या किमती तर आज प्रचंड वाढलेल्या आहेत. या किमती औषधांना कचरापेटी न दाखवता, एखाद्या समाजसेवी संस्थेला देणगीदाखल दिल्यास ती फक्त काटकसरच नव्हे तर समाजसेवा आणि देशसेवाही ठरेल. कारण अशा कृतीमुळे ही उरलेली औषधे इतर गरजू रुग्णांच्या उपयोगी येऊ शकतात. जी गोष्ट औषधांची तीच गोष्ट रुग्णोपयोगी साहित्याची! घरात एखादी वृद्ध व्यक्ती दीर्घकाळ आजारी असते. अशा व्यक्तीसाठी वॉटरबेड, व्हीलचेअर, वॉकर यासारखी एखादी वस्तू रुग्णाच्या वापरात असते. रुग्ण बरा झाला किंवा निवर्तला की ती वस्तू अडगळीत पडते. या वस्तू स्वस्त नसतात. अशा वस्तू अडगळीत न टाकता त्यांचा उपयोग गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी झाला तर ते पुण्यकर्मच ठरेल. अशा वेळी भावनाप्रधान होऊन वस्तू कुठेतरी न टाकता, रुग्णोपयोगी वस्तू गरजूंना विनामूल्य पुरविण्याचे काम करणाऱ्यांना त्या दान कराव्यात. काटकसर कोणाला आवडत नाही? पण काटकसर ही योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी केली तर आर्थिक बचत तर होतेच, पण त्यातून आपल्याला आणि इतरांना स्वास्थ्य आणि समाधान मिळते. - मितव्यय । १२५