पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्महत्या का करते? व्यक्तीचे आणि समाजाचे विघटन अशा दोन दृष्टिकोनातून आत्महत्येच्या कारणांची मीमांसा झाली आहे. आत्महत्या हा एक गुंतागुंतीचा, विविध पैलू असलेला, जटील असा मानवी स्वभावाचा आविष्कार असला तरी प्रचंड मानसिक तणाव आणि अतिनैराश्य या गोष्टी व्यक्तीला स्वत:चे जीवन संपविण्यास उद्युक्त करतात. खरे तर जीवन हा आशा-निराशेचा खेळ आहे. सुखदुःखांच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेले ते सुंदर वस्त्र आहे. या जीवनात चांगले-वाईट प्रसंग नेहमीच येत असतात. चांगल्या प्रसंगांचे आपण जसे आनंदाने स्वागत करतो, तसे वाईटाचेही करायला सिद्ध असले पाहिजे. जीवन म्हणजे न सुटणारे कोडे आहे. ते सोडवत सोडवत कल्पनेत रमायचे असते, ते अनुभवत जगायचे असते. जीवनात पदोपदी अनेक प्रश्न आ वासून उभे राहात असतात. ते प्रश्न एकाग्रतेने आणि चिकाटीने सोडवायचे असतात. ज्या व्यक्तीला जीवनात काही बनायचे असते, जीवन चांगल्या रीतीने जगायचे असते, प्रगती करायची असते, तिने बाहेरच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच प्रयत्न करायला हवेत. जीवनाची वाट चालताना 'मी इतरांसाठी काय करतो?' यापेक्षा 'इतर माझ्यासाठी काय करतात?' हा विचार मनात वारंवार येत असतो. हा विचार झटकून आधी स्वत:कडे पाहायला शिकावे. स्वत:ची योग्यता, सामर्थ्य ओळखावे. आपल्याजवळ जे काही थोडे-फार गुण आहेत, त्यांकडे लक्ष द्यावे. त्या गुणांचा आदर करायला शिकावे. स्वत:चा दुबळेपणा, आजार, कमतरता यांचे फाजील लाड करू नयेत. त्यांच्याकडे मनाचा कब्जा देऊ नये. माणसाच्या मनात ज्या प्रकारचे विचार असतात, त्यांनुसारच त्याची जडणघडण होत असते. माणूस स्वत:च स्वत:चा भाग्यविधाता असतो. अर्थात दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांची कास त्याने सोडता कामा नये. अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. काही ना काही प्रमाणात अपयश हे प्रत्येकाच्याच नशिबी असते. अपयश हा काही गुन्हा नव्हे. १२८ । जगण्यात अर्थ आहे..