पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्षुल्लक प्रश्नासाठी जीव देणे हा भ्याडपणा नव्हे का? आपला जीव इतका चिल्लर-कवडीमोल नाही की, आला विचार नि केली आत्महत्या आयुष्यात कितीही आणि कितीही मोठे प्रश्न येवोत; निराश होऊ नये, हतबल होऊ नये. कशाला नि कोणाला घाबरू नये. चिकाटी सोडू नये, धीर सोडू नये. निश्चय करावा. आत्मसन्मान करावा. आत्मादर करावा. प्रतिज्ञा करावी की, आत्मसन्मान हा माझा दृढनिश्चय आहे. माझे प्रश्न माझ्या आवाक्यातील आहेत. माझ्या कामावर माझी निष्ठा आहे. माझ्या अंगातील चांगल्या गुणांचा आणि सवयींचा मला अभिमान आहे. त्या गुणांच्या बळावर माझ्या समस्या सोडविण्याचा मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे आणि माझ्यावर अवलंबून असलेल्या सर्वांचे भान ठेवीन आणि प्रत्येकाला न्याय देईन. माझे काम आणि माझे ध्येय यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझे जगणे आणि प्रामाणिकपणे कर्तव्य करणे यांतच माझे सौख्य सामावले आहे. सभोवतालचे वास्तव डोळस नजरेने पाहिले, अंतर्मनाला साद घातली, सद्विवेकबुद्धीला स्मरले तर लक्षात येते की, आत्मसन्मान, आत्मादर, आत्मनिष्ठा, दीनदुबळ्यांना मदत, सीमेवर परकीय शक्तींचा मुकाबला, देशातील स्वकीय अधम शक्तींशी दोन हात, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांचा नायनाट, रक्तदान - नेत्रदान - मूत्रपिंडदान - अवयवदान - देहदान, देशासाठी बलिदान असे किती तरी चांगले पर्याय आत्महत्येला आहेत. आत्महत्येला पर्याय आहे । १३१