पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. 'वृद्धावस्था म्हणजे साठीनंतरचे दुसरे बालपण सुरू होणे' असे म्हणतात ते बऱ्याच अंशी खरे आहे. कर्तृत्वसंपन्न जीवन व्यतीत केलेल्या व्यक्तींना शांत बसणे आवडत नाही. शरीराला सहन न होणारे कष्ट केले जातात. त्यातून अस्थिभंगासारखे अपघात उद्भवतात. शरीर साथ देत नसल्याने हट्टीपणा वाढतो. काही वृद्ध व्यक्तींना वयाची सत्तरी-पंच्याहत्तरी ओलांडली तरी घरातील कर्तेपणा सोडवत नाही. जमाखर्चाच्या हिशोबापासून तिजोरीच्या किल्ल्यांपर्यंतचा ताबा स्वत:कडेच ठेवला जातो. मुलाने चाळिशी ओलांडली तरी त्याला नाकर्तेपणाचीच जोड दिली जाते. 'जनरेशन गॅप' ही असतेच असते. त्यामुळे 'आमच्या वेळी हे असं नव्हतं... ' चे पालुपद वारंवार मुलांना, सुनांना नि नातवंडांना ऐकावे लागते. कौटुंबिक वादविवाद होण्यात केवळ वृद्धांचाच हात असतो असे मात्र नाही. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. वयोवृद्ध व्यक्तींना सन्मानाची वागणूक हवी असते, आपुलकीचे दोन शब्द हवे असतात. आजारपणे सुरू असतील तर औषधांसाठी कनवटीला दोन पैसे असावेत ही त्यांची रास्त आणि नैसर्गिक इच्छा असते. हा कोणत्याही प्रकारचा आर्थिक हव्यास नाही. याला कोणी लोभीपणा म्हणत असतील तर ते शहाणपणाचे ठरणार नाही. घरातील व्यक्तीच जर अपमानास्पद वागणूक देऊ लागल्या किंवा उपेक्षा करू लागल्या तर, वृद्धापकाळात निराशा येऊ लागते. आपण एकाकी पडल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते आणि या काळात शारीरिक विकारांबरोबरच मानसिक ताणतणाव जीवघेणे ठरू शकतात. वृद्धावस्थेत होणाऱ्या शारीरिक बदलांचा वेग आणि तीव्रता या गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये सारख्याच असतात असे नाही. शरीरातील अनेक रासायनिक बदलांचे नियंत्रण विकर ( एन्झाईम) हा घटक करतो. वाढत्या वयानुसार विकरांच्या कार्यक्षमतेत बदल होतो तसेच अंत:स्त्रावी ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या स्त्रावांचे (हार्मोन्स) प्रमाण कमी होते. कोलॅजेन नावाचे प्रथिन त्वचा आणि हाडांमध्ये जमा होते. शरीरातील अॅन्टिऑक्सिडंट आणि फ्री रॅडिकल यांच्यांतील संतुलन वृद्धांसाठी सन्मानपूर्वक... । १४३