पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे तरुण, साहित्यप्रेमी स्नेही डॉ. अनिल मडके हे आपला यशस्वी वैद्यकीय व्यवसाय निष्ठेने सांभाळून अन्य अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत स्वेच्छेने भाग घेत असतात. आरोग्यविषयक प्रश्नांचा आणि इतर समस्यांचा परामर्श घेण्यासाठी ते 'जनस्वास्थ्य' नावाचे एक मासिक गेली चौदा-पंधरा वर्षे सातत्याने चालवीत आहेत. या संपादकीय लेखांच्या संग्रहात एका समंजस, समाजमनस्क, तरुण डॉक्टरांच्या सर्वसामान्य माणसांचे सुखस्वास्थ्य आणि आनंद यांचा स्वनिरपेक्ष शोध घेणारे मन प्रतिबिंबित झाले आहे. डॉक्टरांची शैली सुबोध आहे. ते वैद्यकीय परिभाषांचा उपयोग करीत नाहीत आणि आपले म्हणणे वाचकांना पटवून देण्यासाठी उदाहरणांचा, आठवणींचा, छोट्या कथा-हकीकतींचा रंजक उपयोग करतात. मार्गदर्शनपर विचार मांडताना ते आदेशवजा विधाने न करता, आर्जवी स्वरांतील प्रेमळ आवाहने करतात. त्यामुळे वाचकांत नाराजी अगर रोष उत्पन्न होण्याची शक्यता उरत नाही. 'इसापनीती'सारख्या आधुनिक बोधकथाही ते सहजपणे सांगून जातात. नियतकालिकाच्या मर्यादेमुळे हे लेखन आटोपशीर करावे लागलेले आहे. आपल्या विचारांची विस्ताराने मांडणी करणारे लेखन त्यांनी करावे असे सुचवावेसे वाटते. म. द. हातकणंगलेकर 1360 अक्षता प्रकाशन जगण्यात अर्थ आहे। डॉ. अनिल मडके । अक्षता प्रकाशन