पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतरांशी तुलना करण्याची वृत्ती हे बऱ्याचदा अनेकांच्या दुःखाचे कारण असते. ही वृत्ती मनातून काढून टाकायला हवी. आपल्याजवळही बऱ्याच गोष्टी, बरेच सद्गुण असे असतात की, जे इतरांजवळ नसतात; पण ते आपण विसरून जातो आणि छोट्या-मोठ्या आनंदाला मुकतो. जीवनातला खरा आनंद उपभोगण्यासाठी, या पृथ्वीतलावरच 'स्वर्गसुख' चाखण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जीवन स्वीकारायला हवे. याचा अर्थ असा नव्हे की, काहीही न करता स्वस्थ पडून राहावे, लोळत राहावे, जे जे होईल ते ते पाहात राहावे. या उलट दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींना महत्त्व देऊन उत्कर्षासाठी काम करत राहायला हवे, झटत राहायला हवे. बी जमिनीत पेरले म्हणजे एक दिवस त्यातून रोप उगवते, त्याचा वृक्ष होतो; ते फळा-फुलांनी बहरते. या बीजाचा वृक्ष कसा होतो? तर या जमिनीत एक ताकद असते. जमिनीवर पाऊस पडतो. सूर्यप्रकाश पडतो. या सर्व बाहेरच्या गोष्टींचा बीजावर परिणाम होऊ त्याला अंकुर फुटतो आणि तो वाढून त्याचा वृक्ष होतो. बीज डब्यात ठेवले तर त्याचा वृक्ष नाही होत. पण बीजाभोवतालच्या या वातावरणामुळे त्याचा वृक्ष होतो. म्हणून आपण आपल्या भोवतालचे वातावरण प्रसन्न आणि उत्साही ठेवले तर त्यातून आपल्या 'आकांक्षा रूपी बीजाचा वृक्ष होईल. वातावरण चांगले ठेवायचे म्हणजे काय करायचे? सतत हसतमुख आणि आशावादी राहायचे. इतरांना आपल्यात आवड निर्माण व्हावी असा प्रयत्न करायचा. प्रत्येकावर प्रेम करायचे. क्रोध टाळावयाचा. अंगी संयम येण्यासाठी सतत प्रयत्न करावयाचा. इतरांशी तुलना करण्याची वृत्ती सोडून द्यायची. इतरांना क्षमा करण्याची वृत्ती जोपासायची. हे आपण आचरणात आणले तर भोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. इतरांचे जीवन आनंददायी होण्यास मदत होईल. आपण लोकांना हवेहवेसे वाटू आणि मग आपल्या अंतर्मनात, आपल्या हृदयात एक स्वर सतत उमटत राहील, 'जगण्यात अर्थ आहे...!' जगण्यात अर्थ आहे । २१