पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे असं का होतं? प्रश्नाचे 'असे' उत्तर आणि चेहऱ्यावरील 'तसे' भाव याचे कारण म्हणजे चेहऱ्यावर दिसत असलेली आणि तेवढ्याच प्रमाणात चेहऱ्यामागे लपलेली काळजी! काळजी, चिंता... एक मानसिक व्यथा. मानसिक व्याधी. जी व्यक्तीचे सामर्थ्य नष्ट करून मानसिक व्याधीबरोबर शारीरिक व्याधींना आमंत्रित करते आणि आयुष्याचा वेग, आयुष्याची लांबी-रुंदी, आयुष्यातील मौजमजा, सुखसमाधान, शांती या सर्वांचा 'भागाकार' करते. काळजी अनेक प्रकारची असू शकते. एक प्रकार म्हणजे ठरावीक परिस्थितीत उद्भवणारी काळजी. उदाहरणार्थ परीक्षा, आजार, प्रवास... इत्यादी. ठरावीक काळानंतर ही काळजी संपते. दुसरा प्रकार असा की, काही व्यक्ती नेहमीच कसली ना कसली, कुणाची ना कुणाची, कशाची ना कशाची, कुठे ना कुठे काळजी करीत असतात. काहींना काल घडलेल्या घडविलेल्या गोष्टींची काळजी असते; तर काहीजण आज घडणाऱ्या गोष्टींची काळजी करत असतात. पण बहुतांशी लोकांना म्हणजेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना 'माझं - आमचं उद्या कसं होणार' याची काळजी असते. पण अशी काळजी करत असताना, आपण सर्वजण हे विसरतो की, उद्याच्या काळजीत आजचा आनंद गमावत आहोत. 'आजचा दिवस काळजीत नको घालवूया. आपले काम करूया. काम करताना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, बुद्धी - थोडक्यात तन, मन, धन पणाला लावूया.' असे ठरविणाऱ्याचा 'उद्या' नक्कीच चांगला असणार यात तिळमात्र शंका नाही. काळजी करत बसलो तर तिचा परिणाम आपल्या कामावर, आरोग्यावर होतो आणि उद्याची परिस्थिती खरोखरच 'काळजी करण्यासारखी' होते. ज्या उद्याविषयी आपल्याला फारसं काही माहीत नाही, त्या उद्याची काळजी कशाला? येणाऱ्या संकटाचा आत्ताच विचार कशाला? हं, त्याच्याशी मुकाबला करायची किंवा त्याच्यावर मात करायची तयारी जरूर करावी. त्यादृष्टीने उद्याच्या संकटाची तीव्रता आज कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. व्यर्थ चिंता, काळजी करू नये. काळजी घ्या. काळजी करू नका । २३