पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हसतमुख राहावे. जर आपण हसतमुख असू तर सभोवतालचे जग आनंददायी आणि उत्साहवर्धक दिसेल. आपणच जर काळजीने त्रस्त असू तर सारे जग आपल्याला निरस दिसेल; निराशेने भरले दिसेल. हसतमुख असू तर आपला सहवास सर्वांना आवडतो. जर आपण त्रासिक, वैतागलेल्या चेहऱ्याचे असू तर शक्यतो कोणी जवळ येण्याचा प्रयत्न करीत नाही. येणारा उद्या आनंददायी असावा असे वाटत असेल तर आज कोणाचा आनंद हिरावून घेऊ नये. उलट इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. काळजीच्या अनेक कारणांपैकी 'पैसा' हे एक महत्त्वाचे कारण आहे. आजच्या या मशीनच्या युगात माणसेदेखील मशीनसारखी भासू लागली आहेत. बऱ्याचदा असे वाटते की, माणूस नावाच्या प्राण्याने 'वागायचेच' सोडून दिले आहे. चांगले अथवा वाईट हा शब्दप्रयोग वागणाऱ्यांसाठी. इथे फक्त मशीनसारखे भासणे उरले आहे. एखाद्या प्रामाणिक मध्यमवर्गीयाला काळजी असते की, 'मित्राचे शंभर रुपये कोणत्याही परिस्थितीत लवकर परत करायला हवेत. कसे करावेत?' तर दुसरा एखादा 'बिलंदर' 'आपल्या मित्राचे शंभर कोटी रुपये कसे बुडवायचे?' या काळजीत असतो. एखादा गरीब 'काय खायचे?' या काळजीत असतो, तर एखादा धनाढ्य भरपूर खाल्ल्यानंतर ते पचत नाही म्हणून काळजीत असतो. (येथे आजच्या ‘अशा' युगात पैसा आणि अन्न या दोन्हींसाठी हे अभिप्रेत आहे.) एखादी लहान-सहान गोष्ट करताना दैनंदिन जीवनात आपल्याला दुसरा माणूस विचारतो, "हे तू का करतोस? यातून तुला किती सुटतात ?” त्याला विचारायचे असते की, “तुला या कामातून किती पैसे मिळतात ?” म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक कृतीला पैशाचे मोजमाप लावायची आपल्याला सवय लागली आहे. प्रत्येक कृती पैशाने किती मोठी याचा प्रत्येकजण विचार करत आहे आणि दुर्दैवाने माणसाची आणि माणुसकीची पारखसुद्धा या जगात आज पैशानेच केली जात आहे, हे दु:खदायक आहे. २४ । जगण्यात अर्थ आहे..