पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळजीच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, खोटे बोलण्याची सवय. कळत-नकळत मोठ्या किंवा छोट्या गोष्टींबाबत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला काळजी ही असतेच. कारण अशा व्यक्तीला ती कुणाबरोबर कोठे, काय, कसे खोटे बोललेय हे सतत लक्षात ठेवावे लागते. याची तिला कुठे तरी आत काळजी असतेच. खरे बोलणाऱ्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवावी लागत नाही. अनेक चिंतांचा जन्म 'लैंगिक जीवन' या विषयातून होतो. लैंगिक प्रवृत्ती, हस्तमैथुन, संभोगातील असमाधान, वैवाहिक संबंध, घटस्फोट आणि अशा विषयांशी संबंधित बाबींमुळे बऱ्याच चिंता निर्माण होतात. सर्व चिंतांचे मूळ म्हणजे मन होय. 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे खोटे नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या जडणघडणीमुळे, मनावर झालेल्या परिणामांमुळे, मानसिक बदलामुळे, चिंतेने-काळजीने मनाला ग्रासलेले असते. म्हणून मन खंबीर असणे ही चिंतामुक्त जीवनासाठी आवश्यक गोष्ट आहे. काळजीमुळे काय होते? काळजीमुळे जीवन आजारी होते, विकृत होते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आशावादी व्यक्ती काळजीमुळे निराशावादी होते. काळजीमुळे मानसिक ताण-तणाव निर्माण होतात. अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागत नाही. वारंवार झोपेतून जाग येते. सकाळी उठल्यानंतर टवटवी येत नाही. डोकेदुखी सुरू होते; वाढते. भूक मंदावते. छातीत दुखू लागते. वारंवार अस्वस्थता येते. थोड्याशाच श्रमाने थकवा जाणवतो. रक्तदाब वाढतो. पाठदुखी, कंबरदुखी सुरू होते. हातापायांत मुंग्या येतात. हातपाय थरथरतात. काळजीमुळे माणूस हसायचे विसरतो. शरीर म्हातारे होऊ लागते. शरीराच्या संगतीला सुरकुत्या येऊ लागतात. स्वभाव चिडचिडा बनतो. मेंदूची कार्यक्षमता कमी होते. मेंदूच्या पेशी कमकुवत होतात, अकार्यक्षम होतात. आयुष्यमर्यादा कमी होते. मृत्यू थोडा-थोडा आपल्याकडे सरकू लागतो... काळजी घ्या. काळजी करू नका । २५