पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाणे, निदान होण्यास मदत करणे आणि एड्स आहे हे सिद्ध झाल्यास त्यावर तज्ज्ञाकडून उपचार घेणे हे शहाणपणाचे ठरते. एड्स लपविला तरी त्याचे परिणाम लपत नाहीत. उपचार घेतले नाहीत तर एड्स वेगाने शरीरभर पसरतो आणि अर्थातच मृत्यूही लवकर येतो. दुर्दैवाने आज अनेक जण झाडपाला, देशी औषधे, आयुर्वेदाच्या नावाखाली माथी मारली जाणारी औषधे यांकडे वळतात. पदरी निराशा येते. मग अॅलोपॅथीकडे वळतात. पांढऱ्या पेशींची संख्या एका विशिष्ट पातळीपेक्षा खालावली की, मग उपचार अवघड होऊन बसतात. म्हणून एड्सचे निदान झाल्याबरोबर वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेली - अर्थात् अॅलोपॅथीची औषधे वापरावीत. - आणखी एक मुद्दा. एड्सबाधित स्त्रीने अपत्यप्राप्तीचा आनंद घ्यावा की नाही? आज-काल अनेक वृत्तपत्रांतून मोठ्या मोठ्या जाहिराती पाहावयास मिळतात. पण एड्सबाधित स्त्रीने अपत्यप्राप्तीचा हट्ट धरू नये. भारतासारख्या विकसनशील देशात जेव्हा एड्सच्या रुग्णाचे निदान होते तेव्हा पांढऱ्या पेशींचे प्रमाण अत्यंत कमी असते. अशा स्त्रियांना उपचार देऊन देखील होणारी संतती एड्सबाधित नसेलच याची खात्री देता येत नाही. आधीच स्वत:ला आणि जोडीदाराला एड्स असेल, त्यासाठी उपचारावर खर्च होत असेल तर पुन्हा एड्सबाधित अपत्याला जन्म देऊन संकटे का वाढवायची? कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीची 'आई व्हावे' अशी मनोमन इच्छा असते. मातृत्व ही केवळ उपाधी नव्हे तर 'शान' समजणारा आपला समाज आहे. किंबहुना एखाद्या मुलीने भले करिअर केले नाही तरी चालेल, पण विवाह आणि त्यानंतर मातृत्व ही शिखरे गाठली नाहीत तर तिच्याकडे विक्षिप्त नजरेने पाहणारा आपला समाज आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला बाळ असावं असं वाटणं स्वाभाविक असलं तरी आपल्या बाळाला एड्स असावा असे कोणत्या स्त्रीला वाटेल? आणि मग त्या मुलाचा आजार, विविध जंतुसंसर्ग, त्यांवरील उपचार, त्यांचा खर्च, त्या मुलाचे भवितव्य... असे एक ना अनेक प्रश्न पुढे तयारच असतात. म्हणून अशा स्त्रियांनी किंवा दांपत्यांनी एखाद्या अनाथ बालकाला दत्तक घेऊन त्याचा जबाबदार वर्तन । ३५