पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपली मनोवृत्ती आपल्या शरीरावर परिणाम करत असते. मनात जर चिंता, दु:ख, असंतोष, अप्रामाणिकपणा, मत्सर, द्वेष असेल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. अगदी शरीरशास्त्रानुसार विचार केल्यास शरीराच्या सर्व अवयवांचा एकमेकांशी परस्परसंबंध असतो. जेव्हा आपण एखादी दु:खद किंवा क्लेशकारक बातमी ऐकतो, तेव्हा मन दुःखी - खिन्न होते. चेहरा पडतो. शरीरावर याचा अर्थातच प्रतिकूल परिणाम होतो. पचनशक्ती क्षीण होते, शारीरिक विकार बळावतात. दु:खाचा एखाद्या जालीम विषाप्रमाणे, कदाचित हळूहळू पण हमखास परिणाम शरीरावर होत असतो. ज्याप्रमाणे दुःखद घटनेचा किंवा वाईट बातमीचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, त्याचप्रमाणे आनंदी वृत्तीचा आणि प्रसन्न, हसतमुख चेहऱ्याचा चांगला परिणाम शरीरावर होतो. हसतमुख चेहऱ्यामुळे, हास्यामुळे काय होत नाही? हास्यामुळे शरीराला व्यायाम तर होतोच; पण अनेक महत्त्वाच्या, उपयुक्त अशा शारीरिक क्रिया घडतात. आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे फायदे रडण्यापेक्षा अधिक असतात. हसण्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या उत्तेजित होतात. रक्ताचा प्रवाह वाढतो. त्यामुळे सर्वत्र रक्तपुरवठा चांगला होतो. हसण्यामुळे उच्च रक्तदाब आणि डोकेदुखी यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. श्वसनसंस्था सुधारते. ताजी होते. श्वास वेगाने चालतो. त्यामुळे आपण हवेतून जादा प्राणवायू घेतो. शारीरिक दृष्टीने हास्याचा जन्म फुप्फुसात होतो. हसण्यामुळे फुप्फुसाचे, छातीचे चांगले प्रसरण होते. बऱ्याचदा आपण म्हणतो की, 'पोट धरधरून हसलो.' पोट न धरता हसलो तरी, हसताना पोट आपोआप हालते आणि पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. सततच्या हास्यामुळे पोट घुसळले जाते आणि अन्नपचन चांगले होते. जठर आणि आतड्यांचे कार्य चांगले राहते. आश्चर्य वाटेल पण साध्या स्मितहास्यासाठी देखील किमान तेरा स्नायू कार्यरत व्हावे लागतात. हसण्यामुळे त्वचेमधील घाम बाहेर टाकणाऱ्या पेशी उत्तेजित होतात, ताज्या होतात आणि शरीरात नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. ३८ । जगण्यात अर्थ आहे..