पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हसण्यामुळे शरीराच्या सर्व क्रिया अधिक चांगल्या रीतीने होऊ लागतात. हसताना शरीराची एकत्रित हालचाल होत असते. त्यामुळे शरीराला एक लय प्राप्त होते. 'हसा आणि लठ्ठ व्हा ' असे वचन आहे, त्यामागेही एक तत्त्वज्ञान आहे. हसणे म्हणजे एक प्रकारचे टॉनिकच आहे. ‘टॉनिक घेतल्याने जसे वजन वाढते, त्याप्रमाणे हसण्यामुळे स्वास्थ्य लाभते' असा अर्थ यात अभिप्रेत आहे. खरे तर निसर्गाने हास्य हे दुःखावर निर्माण केलेले एक फायदेशीर औषध आहे. त्याचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे. 'लॅन्सेट' नावाच्या वैद्यकीय नियतकालिकानुसार प्रसन्न मनोवृत्तीची गरज आजारी आणि अशक्त व्यक्तींना जास्त असते. आजारी व्यक्ती प्रसन्न मनोवृत्तीच्या जोरावर तगू शकतात; जगू शकतात. कारण ही मनोवृत्ती जगण्याची इच्छा निर्माण करते. जीवनाला नवे परिमाण देते. प्रत्येक माणसाचे जीवन हे काही साखरेसारखे गोड, लोण्यासारखे मऊ नसते. त्यात दु:ख असते, खाचखळगे असतात, संकटे असतात. दुःख किंवा सुख यांचे स्वरूप आपल्या मनावर,आपण मानण्यावर असते. अशा कठीण स्थितीतसुद्धा खंबीर राहून, , निश्चल राहून मन आनंदी ठेवणे ही एक प्रकारची नैसर्गिक प्रवृत्ती असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संकटे आणि अडचणी येऊनदेखील जो मनुष्य आपली वृत्ती उत्तेजित आणि प्रफुल्लित ठेवतो, तो सुखरूप पार पडतो. जो मनुष्य जन्मभर चिंता करीत राहतो, तो जन्माचा कैदी बनतो. दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा मनुष्य आणि अंधारकोठडीची शिक्षा झालेला कैदी यांच्या मानसिकतेत बहुधा फरक नसावा. ज्याला आनंदी स्वभावाची देणगी मिळालेली नाही किंवा जो आनंदी वृत्ती साध्य करून घेत नाही, त्याच्या पदरी निराशा आल्यावाचून राहत नाही. अशा व्यक्तीच्या उत्कर्षाच्या मार्गात पदोपदी अडचणी येतात. जो माणूस सतत काळजीत राहतो, चिडतो, त्याच्या शारीरिक आणि मानसिक शक्ती दुर्बल होतात. तो आपल्या आयुष्याचे ध्येय गाठू शकत नाही. तो भांडखोर, गर्विष्ठ, मनमानी आणि स्वार्थी बनतो. हे दुर्गुण टाळण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे हास्य होय. चेहऱ्याला 'हसू' द्या । ३९