पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हसतमुख राहण्यामुळे हेकटपणा जातो. वृत्ती प्रसन्न राहते. प्रसन्न वृत्तीमुळे मन कणखर होते आणि कणखर मन शरीराला बळकट करते आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभते. आपण दररोज किमान दोन-तीनवेळा तरी हसायला हवे. हसण्यासाठी कारण असो अगर नसो. आपल्याला कदाचित या सांगण्याचेच हसू येईल. पण कारण नसताना देखील अगदी एकटे असताना एकांतात हसावे. मनसोक्त हसावे. ते आरोग्यदायी असते. काही लोकांना हसण्याचे जिवावर येते, तर काही लोकांना मोठ्यांदा हसणे किंवा खो खो हसणे शिष्टाचारास धरून नाही असे वाटते. अशा लोकांना गंभीर मुद्रा, झकपक कपडे, शृंगारसाधनांचा वापर म्हणजेच शिष्टाचार आणि सभ्यतेची वागणूक असे वाटते. अशा चेहऱ्याची माणसे समाजात राहण्यास योग्य नाहीत असे एके ठिकाणी म्हटले आहे. 'जर तुम्ही हसतमुख नसाल तर त्या दिवशी काहीही करू नका. बाहेर पडू नका. बंद खोलीत बसा. नाहीतर तुम्ही इतरांना विनाकारण दुःखी कराल.' असेही या व्यक्तींना उद्देशून म्हटले आहे. जर तुम्ही प्रसन्न आणि हसतमुख असाल तर सर्वांचाच फायदा होतो. कसे जगावे हे जर तुम्हांला शिकायचे असेल तर आधी हसतमुख राहायला शिका. दिवसाची सुरुवात स्मितहास्याने व्हायला हवी. आपण तर हसतमुख राहावेच परंतु घरातल्या लहान मुलांनाही हसतमुख, प्रसन्न राहायला शिकवावे. हसऱ्या व्यक्तींच्या मागोमाग यश अधिक वेगाने येते. हास्यरूपी असतील तर यशरूपी फळ हे मिळणारच. हसण्यामुळे फक्त हसणाऱ्याचाच फायदा होत नाही, तर ते अनुभवणाऱ्या, पाहणाऱ्या सभोवतालच्या व्यक्तींनाही त्याचा लाभ होतो. हास्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. ऑफिसमधील बॉस हसऱ्या चेहऱ्याचे असतील तर सर्व स्टाफ मनापासून आणि भरपूर काम करतो. शिक्षक हसरे असतील तर मुलांना सायंकाळच्या पाचऐवजी सकाळची दहाची वेळ आवडू लागते. उद्योगाच्या ठिकाणी स्मितहास्यामुळे कामगारांचे काम वाढते. कार्यक्षमता वाढते, प्रगती होते. हसण्यासाठी पैसे लागत नाहीत. हसण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. पण त्याचा फायदा ४० । जगण्यात अर्थ आहे..