पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाजवू पाहते. मी म्हणेन त्याप्रमाणे इतरांनी वागावे असा आग्रह असतो. 'माझे वागणे बरोबर; इतरांचे चूक.' ही भावना घट्ट असते. संशयी व्यक्ती अनेक बाबतीत स्वार्थी असते. अशी व्यक्ती इतरांच्या भावनांची कदर क्वचितच करते. इतरांच्या चुका काढण्यात पटाईत असलेली ही व्यक्ती स्वत:च्या दुर्गुणांकडे मात्र डोळेझाक करीत असते. जे नियम इतरांना लागू असतात, ते नियम अशी व्यक्ती मात्र राजरोसपणे सर्वांसमक्ष पायदळी तुडवते. 'मी चुकत आहे' ही भावनाच अशा व्यक्तीच्या मनात येत नाही. संशयी व्यक्ती आपल्या जोडीदाराला फक्त स्वत:साठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात जोडीदाराच्या प्रत्येक लहान-सहान कृतीतून आपल्यावरचे प्रेम, आपुलकीची भावना व्यक्त व्हावी अशी इच्छा ठेवते. बऱ्याचदा याचा अतिरेक होतो किंवा एखादा अप्रिय प्रसंग संशयी वृत्तीला खतपाणी घालतो. पती किंवा पत्नी आपल्याशी एकनिष्ठ नाही असे जोडीदाराला वाटणे हे सर्रास आढळणारे उदाहरण संशयी वृत्तीच्या व्यक्तींच्या बाबतीत सांगता येईल. आपल्या जोडीदाराने भिन्न लिंगी व्यक्तीशी संभाषण केले तरी त्याचा संशय येतो. या संशयाला पूरक घटना घडली तर मात्र चैन पडत नाही. ज्याप्रमाणे लाकडाला वाळवी पोखरत जाते, त्याप्रमाणे संशयी व्यक्तीचे मन पोखरत जाते. यातून हळूहळू भावनिक संघर्ष सुरू होतो. मनाची द्विधा अवस्था दैनंदिन हालचालीत नि व्यवहारात व्यक्त होऊ लागते, व्यक्त होत राहते. सुरुवातीची नाराजी शब्दांशिवाय व्यक्त होते. अबोला धरला जातो. वाढतो. त्याचे रूपांतर कधीच क्रोधात झालेले असते. किंबहुना संशयातून निर्माण झालेला क्रोध हेच अबोल्याचे कारण असते. संशय वाढतच असतो. क्रोधही वाढतो. तू- तू, मी-मी होते. शब्दाला शब्द मिळतो. प्रश्नांना उत्तरे मिळतात; पण उत्तरांनी समाधान मिळत नाही. उत्तरापुढे पुन्हा प्रश्नच तयार असतात आणि या प्रश्नांना आता उत्तर मिळत नाही, तर प्रतिप्रश्न भिडायला लागतात. मग निर्माण होतो तो दुरावा मानसिक आणि शारीरिकसुद्धा. ४४ । जगण्यात अर्थ आहे..