पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येथे सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, संशयी जोडीदारापासून मानसिकरीत्या दुरावलेली व्यक्ती इतर मोहपाशांत चटकन अडकू शकते; याचाही विचार संसारकर्त्यांनी करायला हवा. बऱ्याचदा अशा बाबतीत बुद्धी, कर्तव्य, भीती, नीती, संस्कृती आणि नाती... या सर्वांचा विसर पडतो अन् शारीरिक दुराव्याचे पोकळ समर्थन द्विधा मन:स्थिती करते. संसारातील जोडीदाराचा दुरावा सहनही होत नाही, सांगताही येत नाही. समंजस जोडीदार संशयाला संसारात थाराच देत नाहीत. आलाच तर त्याला दुराव्यापर्यंत टिकू देत नाहीत. पण जर असे नसेल किंवा तसे काही घडले असेल तर हा दुरावा वाद निर्माण करतो. वाद वाढला तर वादावादी, प्रसंगी तोडफोड, मारझोड आणि हे सर्व आपल्या निष्पाप मुलांच्या साक्षीने होते. काही वेळा हीच मुलं अक्षरश: साक्षीसाठी कोर्टात बोलावली जातात. घटस्फोटासाठी! संसारातल्या एखाद्या व्यक्तीच्या फक्त 'संशय' या विकृतीमुळे कुटुंबातील सर्वांच्या स्वप्नांचा असा अंत होतो. काही वेळा त्या संसारातील एक किंवा दोन किंवा सर्व जीवांचादेखील! - म्हणून संसारात जर संशयाचा शिरकाव झाला तर आधी सावध व्हा. शंका, संशय यांचे स्वरूप काय आहे ते पाहा. त्यांचे वेळीच निराकरण करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची शहानिशा होत नाही, तोपर्यंत कशावरही विश्वास ठेवू नका. कारण विश्वासातून विश्वास आणि अविश्वासातून अविश्वास निर्माण होतो हे लक्षात ठेवा. विचार करून निर्णय घ्या. अविचार करू नका. विचाराने सुख मिळते तर अविचाराने दुःख अस्वस्थपणा आणि उतावळेपणा या मनाच्या दोन अवस्था संशयाला आमंत्रणच देत असतात. म्हणून मन शांत ठेवा. मनावर संयम ठेवा. आपल्या जोडीदाराबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय घेण्यापूर्वी जोडीदाराच्या मनाचा विचार करा. जोडीदाराने पूर्वी दिलेले आनंदाचे क्षण आठवा. आपल्याबरोबर केलेल्या आपुलकीच्या गोष्टी आठवा. प्रेमाचे आणि विश्वासाचे शब्द आठवा. पूर्वी आपल्यासाठी उपसलेले कष्ट आठवा. मायेचे, ओलाव्याचे भावनिक विश्व आठवा. संसारात संशय नको । ४५