पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रपंचाची सर्वसाधारण व्याख्या आपल्याला ठाऊक असते. काही जणांच्या प्रपंचात आईवडील नसतातच. असतील तर ते जमेत नसतात. बहुतेक ठिकाणी भावंडांची वजाबाकी झालेली असते आणि आयुष्याच्या हमरस्त्यावर प्रपंच या शब्दाचा अर्थ 'मी, माझी बायको आणि माझी मुलं ' असा उरतो. बऱ्याच ठिकाणी बदलत्या (वाईट) परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणामुळे 'मी आणि माझी बायको' एवढीच संसाराची व्याख्या असते आणि तुम्हांला आश्चर्य वाटेल अगदी भरल्या घरात राहत असलेल्या काही व्यक्तींच्या प्रपंचात फक्त मी आणि मीच असतो. अशा व्यक्ती नेहमी स्वत:बद्दलच विचार करीत असतात. आपण दैनंदिन जीवनात जो विचार करतो, तो तीन पातळ्यांवरचा असतो. किंबहुना प्रत्येक व्यक्ती या तीन पातळ्यांवर जगत असते. 'मी अन् माझे कुटुंब', 'मी अन् माझा व्यवसाय' आणि 'मी अन् माझी मित्रमंडळी'. या तीन पातळ्यांवर जगताना एक विचार सतत कार्यरत असतो, तो म्हणजे तुलना. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या नकळत या तीनही पातळ्यांवर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी तुलना करत असते. मी कसा, तो कसा...! या व्यक्तीकडे अमुक आहे, त्या व्यक्तीकडे तमुक नाही. हा माणूस असा आहे, ती व्यक्ती तशी आहे... असे विचार सतत मनात घोळत असतात. असे विचार मनात घोळताना, घोळवताना जे इतरांजवळ आहे, पण आपल्याजवळ नाही अशा गोष्टी वारंवार डोळ्यांसमोर येत असतात. एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला मिळेपर्यंत आपण तहानभूक हरपून त्यामागे लागतो. ती गोष्ट एकदा का आपल्याला प्राप्त झाली की, आपल्याला होणारे समाधान अत्यंत अल्पकालीन असते. काही काळानंतर दुसरी एखादी नवीनच गोष्ट आपल्याला खुणावते आणि पुन्हा एक धावणे सुरू होते. एखादी वस्तू, एखादा पदार्थ मिळवताना आपल्या सुखाचे मर्म त्या वस्तूत नाही हे ती वस्तू प्राप्त करेपर्यंत आपल्याला समजत नाही. समजा, आपल्याला लाडू खूप आवडतात. एक लाडू खायला दिला तर नक्कीच आनंद होईल. आनंद होत आहे म्हणून जर कोणी आपल्याला एकाच सुख कशात ? । ५५